शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):-प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीकांच्या झालेल्या नूकसानीपोटी जिल्ह्यातील २ दोन लाख शेतक-यांना १७४ कोटी आणि रब्बी हंगामाकरीता १७ हजार ५१७ शेतक-यांना १६ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असल्याचे माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतक-यांच्या पिकांना सरक्षण कवच उपलब्ध करुन दिले आहे. २०२४-२५ या वर्षात या योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील १७ हजार ५१७ शेतक-यांना १६ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मंजुर झाले असल्याचे पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी सांगितले. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती पाहून झालेल्या पंचनाम्यानूसार जिल्ह्यातील ८ हजार ४६७ शेतक-यांना ५ कोटी ६१ लाख आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून ९ हजार ५० शेतक-यांना ११ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदान वर्ग झाले आहे.
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये नुकसान झालेल्या शेतक-यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून १७४ कोटी ९५ लाख रुपये अनुदान मंजुर झाले आहे. अनुदान मिळालेल्या जिल्ह्यातील शेतक-यांची संख्या २ लाखांहून अधिक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.