अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा): – छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे स्वराज्य, स्वातंत्र्य आणि जनकल्याणाच्या कार्यासाठी सदैव प्रेरणास्थान आहेत. येथे उभारलेले प्रवेशद्वार हे केवळ भव्य वास्तू नसून, भावी पिढ्यांना देशभक्ती, शौर्य आणि ऐक्याचा संदेश देणारे स्मारक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
शहरातील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकस्थळी उभारण्यात आलेल्या मराठकालीन शैलीतील प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब पवार, अमोल गाडे, सागर बोरुडे, काकासाहेब तापकीर, सौ. नंदाताई पांडुळे, स्मारक समितीचे यशवंत तोडमल आदी मान्यवर उपस्थित होते.
“आमदार स्थानिक विकास निधीतून अहिल्यानगर शहरात उभारण्यात आलेल्या या प्रवेशद्वाराचे लोकार्पण माझ्याच हस्ते करण्याचा मला मनःस्वी आनंद आहे,” असे प्रा. शिंदे म्हणाले. या उपक्रमाच्या यशासाठी स्मारक समिती, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि स्थानिक नागरिक यांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
“अशा स्मारकांमुळे आपला ऐतिहासिक वारसा जपला जातो आणि समाजात एकतेचा तसेच प्रेरणेचा संदेश पोहोचतो. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असेही त्यांनी सांगितले. तसेच परिसराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेला लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.कार्यक्रमास समितीचे सदस्य, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विकासकामांची पहाणी
स्मारक परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रा. शिंदे यांनी यावेळी पहाणी केली. ही कामे उत्तम पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.