अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा): – आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते” या भावनेतून अॅड. युवराज शिंदे यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत किडनी आजाराबाबत जनजागृती करण्याचे कार्य केले आहे. प्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ. सुहास बावीकर यांचे गरजू रुग्णांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. किडनी आजाराबाबत समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे कार्य या शिबिरातून होईल. दिव्यांग व्यक्ती सकाळी उठल्यापासून आपल्या जीवनाशी संघर्ष करत असतात, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वांनी धावून जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कल्याण रोड, महालक्ष्मी लॉन येथे आयोजित महाकिडनी आरोग्य शिबिर शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक अॅड. युवराज शिंदे, डॉ. सुहास बावीकर, डॉ. पूर्वा बावीकर, डॉ. इक्बाल शेख, डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, जगन्नाथ हल्याळ, अर्चना परकाळे, अफसर शेख, साजिद जागीरदार, सुनिता सूर्यवंशी, निसार मास्टर, जी. एन. शेख, संभाजी चौधरी, अरुण ढाकणे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुहास बावीकर म्हणाले, मनुष्याच्या शरीरात ७९ अवयव असतात. यामध्ये सात अवयव मिळून एक सिस्टीम तयार होते आणि आपले शरीर त्यावर चालते. आपण जीवन जगताना शरीराशी खेळत असतो. व्यसन, चांगला आहार न घेणे, झोपेचे नियोजन नसणे, व्यायामापासून लांब राहणे, तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण विविध आजारांना आमंत्रण देतो. आपल्या देशात मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आजार झाल्यावर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि तपासणी करणे गरजेचे आहे. किडनी आजार होऊ नयेत म्हणून जनजागृती करणे आवश्यक आहे. हा आमचा १३ वा कार्यक्रम असून राज्यभर मोफत शिबिरे आयोजित केली जातात. अॅड. युवराज शिंदे यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे हे शिबिर यशस्वी झाले. रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी मोफत रक्त तपासणीही करण्यात आली. असे ते म्हणाले.
अॅड. युवराज शिंदे म्हणाले, समाजात नवनवीन आजार वाढत आहेत आणि आरोग्यसेवा महाग होत चालली आहे. त्यामुळे गरजू रुग्ण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोठ्या आजाराला सामोरे जातात. यासाठी मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज आहे. डॉ. सुहास बावीकर हे प्रसिद्ध किडनी तज्ञ असून रुग्णांना मोफत लाभ मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन केले. सुमारे ५०० नागरिकांनी लाभ घेतला असून हे शिबिर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.
कार्यक्रमात डॉ. पूर्वा बावीकर आणि डॉ. इक्बाल शेख यांनी नागरिकांच्या किडनीसंबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. प्रास्ताविक अर्चना परकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण ढाकणे यांनी केले.