संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):–माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे .प्रत्येक वाडी वस्तीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवली असून तालुका हा एक परिवार ठरला आहे.
तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 13 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन या रस्त्यांचे कॉन्टिटीकरण करावे याकरता मागणी केली होती. यानुसार शासन पत्र 4 ऑक्टोबर 2024 नुसार टप्पा दोन (बॅच १) च्या निर्णयानुसार 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यामध्ये डिग्रस ते रणखांबवाडी 2.50 किलोमीटरसाठी 3 कोटी 53 लाख 97 हजार, चिखली ते जवळेकडलग 4.600 किलोमीटरसाठी 6 कोटी 31 लाख 89 हजार, खरशिंदे ते खांबे रस्ता दोन किलोमीटरसाठी 2 कोटी 45 लाख 96 हजार रुपये, मिर्जापुर ते धांदरफळ खुर्द रस्ता 4.26 किलोमीटरसाठी 5 कोटी 66 लाख 66 हजार रुपये, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी रस्ता 5.030 किलोमीटरसाठी 6 कोटी 1 लाख 42 हजार रुपये, साकुर ते बिरेवाडी रस्ता 3.850 किलोमीटर लांबीसाठी 4 कोटी 81 लाख 57 हजार रुपये, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता तीन किलोमीटर करता 4 कोटी 16 लाख 3 हजार रुपये, तासकरवाडी ते खंडेराया वाडी रस्ता 5.310 किलोमीटरसाठी 7कोटी 76 लाख 31 हजार रुपये या कामांचा समावेश होता. एकूण 30.570 किलोमीटर लांबीसाठी 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र 7 ऑगस्ट 2025 च्या नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आठ महिन्यांमध्ये नवीन सरकार मधून एक रुपयाचा निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे सर्व कामे रद्द करून आणली आहेत. जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल असा हा डाव आहे. याचबरोबर मागील आठ महिन्यांपासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू झाले आहे.
यामुळे तालुक्यात नवीन लोकप्रतिनिधी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा कुठला दडपशाहीचा प्रकार असा सवाल विचारला जात आहे .
याचबरोबर असे दुर्दैवाचे राजकारण संगमनेर तालुक्यामध्ये कधीही नव्हते अशी भावना तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या या रस्त्यांची कामे रद्द झाल्याने डीग्रस, रणखांबवाडी, साकुर पठार, चिखली, जवळेकडलग, खरशिंदे ,खांबा ,मिर्जापुर , धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द, तिगाव, साकुर, बिरवाडी ,शिंदोडी ,ठाकरवाडी, तासकरवाडी खंडेरायवाडी या गावांमधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाली असून या सर्वांनी या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
माजी मंत्री थोरात यांनी तालुक्यासाठी सातत्याने निधी आणला
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी करताना मागील 40 वर्षात दरवर्षी सरकारमधून सातत्याने निधी आणला
गावोगावी विकास कामे, साखळी बंधारे पूर्ण केली, निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले, सत्ता असो वा नसो माजी मंत्री थोरात यांच्या वैयक्तिक संबंधातून तालुक्याला कायम निधी मिळाला. मात्र प्रथमच निधी न आणता रद्द करण्याचा दुर्दैवी प्रकार तालुक्यात झाल्या असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
रस्त्याचा निधी रद्द करणे दुर्दैवी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धांदरफळ खुर्द गावाकर्ता आणि तालुक्यातील इतर 7 रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र फक्त राजकारण करावे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता यावे याकरता नवीन लोकप्रतिनिधीने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून रद्द केलेल्या कामाचा प्रकार निंदनीय असल्याची टीका माजी सभापती तथा धांदरफळ खुर्दच्या रहिवासी सौ. निशाताई कोकणे यांनी केली आहे