कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा) : – संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपूर येथील डाळींब शेतकरी संतोष दातीर यांना पैसे देण्यासाठी आलेल्या कोल्हार येथील डाळींब व्यापारी शेख इजाज लुकामान यांना खळी-पिंप्री रस्त्यावर भरदिवसा चौघांनी अडवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या मोटारसायकलला पैशाची लावलेली पिशवी घेऊन पसार झाले.
चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लुकमान यांना चाकूसारख्या धारधार शस्त्राने मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले असून पिशवीत दीड लाखाची रोकड होती. ती घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेख इजाज लुकमान (वय २२, हल्ली रा. कोल्हार, ता. राहाता, मूळ रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हा डाळींब व्यापारी आहे. तो श्रीरामपूर येथील व्यापारी प्रदीप पटेल यांच्याकडून १ लाख ५१ हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम डाळींब शेतकरी संतोष दातीर (रा. पिप्री-लौकी अजमपूर, ता. संगमनेर) यांना देण्यासाठी दुचाकीवरून (एम.एच. १७ एडब्लू. ८५४२) चालला होता.
काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास खळी-पिंप्री-लौकी रस्त्यावरील खंडोबा मंदिराजवळ मागून दोन कळ्या रंगांच्या दुचाकीवरून आलेल्या चौघांनी व्यापारी लुकमान यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला दाबली. त्यामुळे ते खाली पडले. यावेळी गाडीला असलेली पैशाची पिशवी हिसकावण्याच्या प्रयत्न त्यांनी केला. लुकमान यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोघांनी चाकूसारख्या धारदार हत्याराने लुकमान यांच्या पाठीत वार करत त्यांना दुखापत केली. यावेळी त्यांच्याजवळ असणारी रोकड घेवून त्या ठिकाणावर काढता पाय घेतला.