वैजापूर(जनता आवाज वृत्तसेवा): – समाजातील खऱ्या अर्थाने ‘रक्षक’ ठरणाऱ्या आपल्या पोलिस दलाला राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एक भावनिक सलामी देत, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संजीवनी अकॅडमी वैजापूर शाळेतील विद्यार्थिनींनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन राखी बांधून कृतज्ञतेची गाठ घट्ट केली.
रक्षाबंधन हा फक्त भाऊ-बहीणींच्या स्नेहाचा सण नाही, तर तो संरक्षण, विश्वास आणि नात्यांच्या जपणुकीचा उत्सव आहे. विद्यार्थिनींनी पोलिस अधिकाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधताना त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि कृतज्ञतेचा प्रकाश होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले – “आमच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र सज्ज राहणारे पोलीस हेच या राखीच्या नात्याचे खरे हक्कदार आहेत.”
या भेटीत विद्यार्थिनींनी पोलिसांच्या सेवेतल्या आव्हानांविषयी, धैर्यपूर्ण प्रसंगांविषयी जाणून घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनीही विद्यार्थिनींना कायदा-सुव्यवस्थेचे महत्त्व, समाजातील जबाबदाऱ्या आणि स्वसंरक्षणाचे तंत्र याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. सुमित कोल्हे, संजीवनी अकॅडमी वैजापूरच्या संचालिका सौ. निकिता कोल्हे व नॉन अकॅडमीक संचालक श्री. डी. एन. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य श्री. प्रवीण शेळके यांनी हा उपक्रम राबवला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव, देशभक्ती आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ करणारा ठरला.