कोऱ्हाळे (जनता आवाज वृत्तसेवा):-गेल्या चार दशकांपासून पाण्यासाठी लढणाऱ्या या भागातील संघर्ष आज संपुष्टात आला आहे. गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात पाणी पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे,असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
कोऱ्हाळे येथे निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याचे जलपूजन डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या वेळी गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, महायुती व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले,मागील आवर्तनात कोऱ्हाळे येथे पाणी आणण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण केला. कालेवाडी व गावठाणात पाणी पोहोचवल्यानंतर आता वंजार लवण येथे पाणी आणल्याशिवाय गावात पाऊल ठेवणार नाही, असे आज या ठिकाणी वचन देतो. पुढील वर्षभरात मतदारसंघातील कोणताही कोपरा पाण्यापासून वंचित राहणार नाही.
पहिल्या दहा किलोमीटर कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक क्षण साध्य झाला. स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि स्व. मधुकरराव पिचड यांचाही या प्रकल्पातील वाटा अमूल्य आहे,”ल असे ते म्हणाले.
ग्रामस्थांना एकतेचे महत्त्व पटवून देताना डॉ. विखे पाटील म्हणाले, पाणी हा केवळ विकासाचा नाही, तर ऐक्याचा प्रतीक आहे. अंतर्गत वाद बाजूला ठेवून गावाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम केले पाहिजे. जेष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागाचा सन्मान एकतेनेच होईल.