अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- सुदृढ व्यक्तींप्रमाणेच दिव्यांग बांधवांनाही सुंदर, सन्मानपूर्ण व आनंदी आयुष्य लाभले पाहिजे. यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन अमूल्य योगदान दिल्यास त्यांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘देशभक्तीचा जल्लोष’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, द्विशा फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता कोतवाल व दिव्यांग कलाकार उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला देशभक्तीचा जल्लोष हा अविस्मरणीय अनुभव आहे. पोलीस विभागाने त्यांना दिलेले व्यासपीठ कौतुकास्पद आहे. दिव्यांग बांधवांची जिद्द, परिश्रम व संघर्ष हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी करताना, दिव्यांग कलाकारांच्या देशभक्तीपर सांगीतिक कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या एकाहून एक नेत्रदीपक देशभक्तीपर गीतांनी पालकमंत्री, मान्यवर व प्रेक्षक भारावून गेले. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.