संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे दिवसा महिला साथीदाराच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला ४८ तासांच्या आत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत ११ लाख ७९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबतचे सविस्तर माहिती असे, की सोमनाथ शिवाजी भडांगे (रा. कौठे कमळेश्वर, ता. संगमनेर) हे १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ९ लाख ९२ हजार २८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली आहे. सदर घरफोडीच्या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता दोन विशेष पथके तयार करण्यात आले. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर, ज्योती शिंदे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पथकाने घटना टिकाणी भेट देवून अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करुन त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास केला. सदर माहितीच्या आधारे हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी टोण्या भाऊसाहेब काळे (रा. शेवगाव) व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. १४ ऑगस्ट रोजी प्राप्त माहितीनुसार सदर आरोपींचा शोध घेत असताना टोण्या काळे हा त्याच्या राहते घरी असल्याचे समजले. त्यानुसार आरोपीच्या घरी जावून त्याचा शोध घेत असताना टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे (वय २०, रा. लखमापुरी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हा मिळून आला. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने राहुल भाऊसाहेब काळे (रा. लखमापुरी, ता. शेवगाव) व देवका अग्नेश चव्हाण (रा. सदर) यांच्यासह केला असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपपूस करता त्याने हे दागिने त्याचे राहत्या घराजवळ पुरुन ठेवल्याचे सांगितल्याने पथकाने ११ लाख ७९ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेला आरोपी टोण्या काळे हा सराईत असून, त्याच्यावर अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खून, जबरी चोरी, घरफोडीचे तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.