23.8 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

ठाकरवाडीच्या प्रज्वलला नेमबाजीसाठी द्रोणाचार्यांची गरज  आर्थिक कुवत नसल्याने शालेय शिक्षण व नेमबाजी अडचणीत                  

 पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – जिल्हा परिषदेच्या वडझिरे येथील ठाकरवाडी शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या ठाकर समाजातील हुशार विद्यार्थी प्रज्वल दादू केदारे या आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या या विद्यार्थ्याने नेमबाजीत कोणतेही प्रशिक्षण न घेता ही अफलातून आहे . त्याला तालुका , जिल्हा , राज्य , देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी एका द्रोणाचार्य गुरुंची व शालेय शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे . त्याला जर ही गरज वेळेवर मिळाली , तर तो नक्कीच देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकेल .

या प्रज्वल विषयी सांगताना प्राथमिक शिक्षक सतीश शेटे म्हणाले की , ठाकरवाडी ची ही वस्ती जवळजवळ जंगलातच आहे , रस्ता इतका अडचणीचा आहे की , तिथून जाताना एखादं जंगली जनावर अचानक अंगावर झेप घेतंय की काय अशी परिस्थिती आहे . घराला संरक्षक भिंत सोडा , साधा पक्का दरवाजा सुद्धा नाही. जंगली श्वापदं कधीही येऊन त्रास देतात. त्यांच्यापासून वाचण्याचं त्याचं एकमेव अस्त्र म्हणजे नेमबाजीतील गलोली तून निशाणा साधण होय .

वाघाचं कातडं पातळ असल्यामुळे जर खरंच या गलोलीतून सुटलेला एखादा दगड त्याला जिव्हारी बसलाच , तर तो परत कधीच त्या भागात फिरकत नाही . हे याचं खरंखुरं ‘प्रयोगातून विज्ञान’ . प्रत्येकाच्या झोपडीपुढं २ – ४ कोंबड्या , शेळ्या , मेंढ्या सतत असल्यामुळं लांडगा , रानमांजर , ऊद , मुंगूस हे तर यांचे नेहमीचेच पाहुणे . त्यामुळं त्यांच्या पाहुणचारासाठी हे स्वस्त, मस्त आणि प्रभावी असं गलोल हत्यार जे एक मूलभूत गरज म्हणून लहान–मोठ्या सगळ्यांनाच शिकून घ्यावं लागतं . या चुणचुणीत प्रज्वल मुलानं आमचे लक्ष वेधून घेतलं . आम्ही सकाळीच त्याची भेट घेतली असता , त्याने अजून नाष्टाही केला नव्हता , जेवण तर दूरच . हातात ‘गलोल’ घेऊन सकाळीच त्याची नेमबाजी चालली होती . त्याला जवळ बोलावून उगाच परीक्षा घेण्याचा मोह झाला , मग काय मीही अगदीच द्रोणाचार्यांच्या अविर्भावात साधारण पंचवीस–तीस फुटांवर पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या स्टीलच्या हंड्याकडे बोट दाखवून त्याला म्हटलं , “ हं , उडव बरं तो हंडा .” तर भलत्याच आत्मविश्वासानं तो म्हणाला ,“ नको रं बाबा , कोच पडंल त्याला…, आई मारील .” मी हसून त्याच्या शेजारच्याच प्लास्टिकच्या ड्रमकडं बोट केलं तर ,“आरं भॉक पडंल त्याला .” तो इतक्या सहज बोलत होता की , नेमबाजी त्याच्यासाठी खूपच क्षुल्लक आहे . पण मला मात्र त्याला काहीच येत नसल्यानं तो खोटं बोलून मला टाळण्याचा प्रयत्न करतोय , असं उगीचच वाटत होतं . शेवटी जवळची बिसलरीची बाटली त्याच्यापासून ३५–४० फुटांवर ठेवून म्हटलं , “ हा आता उडव हिला , फुटली तर फुटुदे माझीच आहे .” आता मात्र त्याच्याजवळ पर्यायच नव्हता . तो पळून जाईल , असा विचार मी करतच होतो , पण दुसऱ्याच क्षणी काही सेकंदात त्यानं नेम धरून ती बाटली उडवली सुद्धा , एव्हढंच नाही , तर ऐन श्रावणात जवळच एका कोंबड्यांच्या खुराड्याजवळ खुडबुड करणाऱ्या एका मुंगसालाही त्यानं शिताफीनं पळवून लावलं. तो काही शिकाऊ नाही , तर अट्टल ‘खिलाडी’ आहे हे लक्षात आलं .

ऑलिम्पिकमध्ये स्थिर वस्तूवर निशाणा साधला जातो , पण इथं मात्र हा अर्जुनासारखा तिथं उपलब्ध असणाऱ्या चालत्या–फिरत्या प्राण्यांवर ( कुत्रा , मुंगूस ,उडणारे पक्षी , खारुताई…) यावर सहजच निशाणा साधत होता . एकंदरीत त्याचं ते कौशल्य पाहून का कोण जाणे , पण मला उगाचच वाटलं की , जर याला खरंच योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळालीच , तर भविष्यात तो भारताला एखादं तरी नेमबाजीतलं ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून देईल . पण त्यासाठी आत्तापासूनच त्याला ‘A ’ for APPLE ऐवजी ‘A’ for ARCHERY आणि ‘S’ for SHOOTING प्रात्यक्षिकासह शिकवण्याची गरज आहे . कदाचित असंही होईल ‘आर्चरी’ आणि ‘रायफल शूटिंग’ हा प्रकार त्याला जेव्हा माहीत होईल , तोपर्यंत त्याचं वय सुद्धा निघून गेलेलं असेल आणि सरावासाठी लाखो रुपयांचं धनुष्य अथवा बंदूक त्याला इथं या शेरीकोलदऱ्याच्या डोंगरात कोण आणून देईल आणि कोणते द्रोणाचार्य या एकलव्याला इथं शिकवायला येतील .

मोलमजुरी करून उपजिवीका करणाऱ्या आणि कमालीच्या इमानदार असणाऱ्या अशा अनेक जमातीमधले प्रज्वलसारखे कितीतरी हरविंदरसिंग अथवा अभिनव बिंद्रा फक्त योग्य संधी न मिळाल्यानं जगासमोर येत नाहीत . कदाचित आपली व्यवस्था त्याला कारणीभूत असेलही . ती बदलणं तर शक्यच नाही . पण निव्वळ व्यवस्थेलाच दोष देणंही योग्य नाही . ‘मुलं ही देवाघरची फुलं’ असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला प्रसन्न करणं ….

हे आपलं दरवर्षीच्या चौदा नोव्हेंबरचं टाळ्यांचं वाक्य प्रत्यक्ष अंमलात आणण्यापेक्षा आपण मात्र ज्याचा काडीचाही उपयोग होत नाही अशाच गोष्टी करत बसतो . तासन् –तास मंदिरांबाहेर दर्शनासाठी ताटकळत उभं राहतो , आधीच गडगंज श्रीमंत असणाऱ्या देवस्थानांच्या दानपेटीत हजारो–लाखो रुपये , सोनं–चांदी निनावी टाकतो . एखाद्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी न खात्या देवाला मुक्या प्राण्याचा बळी देऊन जत्रेच्या नावाखाली धुडगूसही घालतो पण अशा एखाद्या गुणी मुलाचं आर्थिक पालकत्व मात्र घेऊ शकत नाही. .

तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न . लोकशाहीनं प्रत्येकाला तो अधिकारही दिलाय . शेवटी एकच माफक अपेक्षा की , मोठ्या माणसांचं जाऊ द्या , हो पण निदान अशा या कोवळ्या , निरागस आणि गुणी मुलांसाठी तरी शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आणि कधीकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या आपल्या या सुजलाम– सुफलाम देशात , ज्यांच्याकडं आशेनं पहावं निदान असा , एखादा तरी गॉडफादर असावा , असे ही शिक्षक सतीश शेटे शेवटी म्हणाले .

याबाबत सरपंच श्री. निलेश केदारे व उपसरपंच श्री ऋषी दिघे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की वस्तीवरील अजूनही काही मुले नेमबाजीत अव्वल आहेत. जर त्यांना एक चांगला प्रशिक्षक मिळाला तर ही मुले नक्कीच इतिहास घडवतील.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!