अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- संतानी आपल्या अभंगांनी आणि विचारांमधून दिलेला संदेशच ग्रामीण भागाला संमृध्द बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पुढाकारने हिवरे बाजार येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे वर्ष आणि संत तुकारामांच्या वैकूंठ गमनाच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषदेच्या शाळेत विकसीत करण्यात आलेल्या ‘ज्ञानोबा-तुकोबा’ सभागृहाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. एक वृक्ष आईसाठी आणि एक वृक्ष देशासाठी या उपक्रमा अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आनंद भंडारी, शिक्षण आधिकारी भास्कर पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर अध्यक्ष अनिल मोहीते, विनायक देशमुख यांच्यासह हिवरे बाजार गावातील संस्थाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी १९९७ साली या गावाला आदर्श गावाचा पहिला पुरस्कार माझ्या हातून दिला गेल्याची आठवण सांगून या गावाने विकासाचा एक आदर्श संपूर्ण देशामध्ये निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये या गावाच्या विकासाचा उल्लेख होणे हीच मोठी कौतूकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. हिवरे बाजार गावाने एक विचार घेवून विकासाचा दृष्टीकोन कायम ठेवला त्यामुळेच या गावाची प्रगती साध्य होवू शकली.
आपल्या महाराष्ट्राला संताच्या माध्यमातून अध्यात्माचा मोठा वारसा मिळाला आहे. संत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीतेतून गावाच्या विकासाचे आणि संत गाडगे बाबांनी गावाच्या स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संत तुकाराम महाराजांनीही आपल्या अभंगातून निसर्ग संपन्नतेचे तत्वज्ञान दिले. गावाच्या विकासासाठी आणि समृध्दतेसाठी संताचा हा विचारच उपयुक्त ठरणा आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी हा विचार कृतीत उतरवून देशापुढे एक आदर्श निर्माण केला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात गावाने केलेल्या विकासाचा आढावा घेवून वृक्षारोपन चळवळीची संकल्पना विषद केली. शैक्षणिक क्षेत्रात गावातील मुलांनी सिध्द केलेल्या गुणवत्तेचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला.