24.5 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

ग्रामसेवक बाचकर आत्महत्या प्रकरण : कोपरगावच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा) : – तालुक्यातील करजगाव येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले असून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली. या घटनेमुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

८ ऑगस्ट रोजी करजगाव ग्रामसेवक बाजीराव बाचकर यांनी मानसिक ताण आणि छळ सहन न झाल्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. घटनेनंतर त्यांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल झाले. बाचकर यांच्या कुटुंबीयांचा आरोप होता की, वरिष्ठ अधिकारी दळवी आणि वाघमोडे यांच्याकडून त्यांना सतत मानसिक त्रास दिला जात होता. त्याचप्रमाणे आर्थिक बाबींमध्येही अवास्तव दबाव टाकला जात होता. या दडपणाखालीच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बाजीराव बाचकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांसह धनगर समाजाचे नेते, नातेवाईक आणि करजगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने पुढे सरसावले. न्याय मिळावा या मागणीसाठी सोनई पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. तब्बल नऊ दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व समाजघटकांचा सहभाग होता. शासन आणि पोलिस प्रशासनाकडून तातडीने कारवाई व्हावी, दोषींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत होती.

शेवटी आंदोलनाला यश आले आणि सोनई पोलिसांनी रात्री उशिरा संदीप दळवी व बबन वाघमोडे या दोघांवर आर्थिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी खऱ्या अर्थाने दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या कडे सोपविण्यात आला आहे. ग्रामसेवकाच्या आत्महत्येमागील नेमकी कारणमीमांसा काय होती, अधिकाऱ्यांनी नेमका कसा छळ केला, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रशासनिक वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून भविष्यातील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामसेवक ही ग्रामपंचायत पातळीवरील महत्त्वाची शासकीय जबाबदारी असते. अशा पदावरील कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे जीव गमवावा लागल्याची घटना चिंताजनक असल्याचे मत स्थानिक नागरिक मांडत आहेत. या घटनेने प्रशासनातील दबाव, भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांवरील मानसिक छळ या गंभीर प्रश्नांना अधोरेखित केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!