श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूरचे वरिष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
बाळासाहेब आगे यांनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या dainik_jay_baba_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व संबंधित एसडीपीओंचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या वृत्तात आरोपी गणेश मुंडे याचे नाव आले होते. त्यानंतर _ganesh._.mundhe_307 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे वृत्त डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकीन अशा आशयाचा धमकीचा संदेश आला.
पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे. गेली 40 वर्षांपासून श्रीरामपूरात अनेक पत्रकार राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी विषयांवर सडेतोड लिखाण करीत आहेत. मात्र आजवर कोणत्याही पत्रकाराला अशा प्रकारे धमकी मिळाली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्त प्रसारित केल्यानंतर धमक्या मिळत असतील, तर शहर पत्रकारितेसाठी कितपत सुरक्षित राहिले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर प्रेस क्लब, श्रीरामपूर पत्रकार संघ, श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघ, बेलापूर पत्रकार संघ आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या प्रतिनिधींनी घटनेचा निषेध करून आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या बैठकीस प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे ,श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, सचिव प्रकाश कुलथे, खजिनदार अनिल पांडे, उपाध्यक्ष करण नवले, विकास अंत्रे, सहसचिव महेश माळवे, राजेंद्र बोरसे, शिवाजी पवार, रवी भागवत, कामगार नेते नागेश सावंत, सुरेश कांगूने, ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, प्रदीप आहेर, नितीन शेळके, उपाध्यक्ष सलीम खान पठाण, सचिव सचिन उघडे ,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असलम बिनसाद, बेलापूर पत्रकार संघाचे देविदास देसाई, दिलीप दायमा, सुहास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.