लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची असून राहाता तालुक्यात एकही पात्र शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची शाखाधिकार्यांनी काळजी घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.
राहाता येथील जिल्हा सहकारी बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयातील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील सभागृहात आयोजित बँकेच्या सेवानिवृत्त शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात म्हस्के बोलत होते. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नामदेव ढोबळ,तालुका विकास अधिकारी सचिन तांबे,कक्षा अधिकारी श्री.गडाख,वसुली अधिकारी श्री.धनवटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
म्हस्के पुढे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा बँकेची स्थापना शेतकरी स्वावलंबी व्हावा या उद्देशाने झालेली आहे.आजपर्यंत बँकेने त्याच दिशेने यशस्वी वाटचाल केली.शेती पीक कर्ज पुरवठ्याबरोबर शेतीच्या जोड धंद्यालाही बँकेने कर्जपुरवठा केला.योग्यवेळी कर्ज उपलब्ध होणे गरजेचे असते.सर्व शाखाधिकारी आणि कर्ज विभागाच्या अधिकाऱ्यांनी पात्र शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.कर्ज वाटपाबरोबरच वसुलीचेही काटेकोर पालन केले पाहिजे.प्रत्येक शाखेला ठेवींचे दिलेले उद्दिष्ठ्य निर्धारित वेळेत पूर्ण करावे.प्रधानमंत्री अपघात विमा योजना प्रत्येक शेतकऱ्या पर्यंत पोहचवून त्यांना योजनेत सहभागी करून घेण्याचे आवाहन करताना तालुक्यातील सेवानिवृत्त ७ शाखाधिकारी व ४ कर्मचाऱ्यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी सेवनिवृत्तांचा व नूतन शाखाधिकाऱ्यांचा सत्कार श्री.म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.विविध शाखांच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्गदर्शन त्यांनी केले.कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.