अकोले(जनता आवाज वृत्तसेवा) :-उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी समजले जाणारे भंडारदरा धरण आज पहाटे तीन वाजता भरले. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी ६ वाजता धरणाच्या स्पीलवे मधून 11406 क्युसेक तर वीज निर्मितीसाठी 850 क्युसेक असा 12 हजार 231 क्युसेक विसर्ग सुरू होता. सकाळी 8 वाजता विसर्ग 20763 क्युसेक करण्यात आला आहे. भंडारदरा धरणात 10763 दलघफू पाणीसाठा ठेऊन धरणात जमा होणारे उर्वरित पाणी सोडून देण्यात येणार आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली.
आज सकाळी भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.टप्याटप्प्याने त्यात वाढ केली जाणार आहे. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरूअसल्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. आज सकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा 7266 दलघफू होता. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे निळवंडे धरणातूनही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज सकाळी प्रशासनाने प्रवरा नदीकाठच्या गावांना नदीपात्रातील पाण्याची वीज पंप साहित्य, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित या वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.