अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-नगर- पुणे महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या दोन टोळ्यातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे पथकाला यश आले आहे. सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावत चार आरोपींसह, तीन विधीसंघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहे. तपासादरम्यान, सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने कारवाई पार पडली. पथकाला सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपीनी साथीदारांसह केला असुन ते सध्या बोल्हेगाव येथील गांधीनगर परिसरात बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून यश भाऊसाहेब शिरसाठ, अथर्व रमेश सुर्यवंशी, साहील अतिफ शेख, विशाल बाबासाहेब पाटोळे सर्व (रा. बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर) यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.
त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपींनी मागील तीन ते चार दिवासापुर्वी सुपा गावाच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबलेलया प्रवाशाच्या ताब्यातील टी.व्ही. एस. कंपनीची स्पोर्ट मोटारसायकल बळजबरीने हिसकवल्याची तसेच सुपा टोलनाक्या जवळील म्हसने फाटा येथे ट्रक चालकाला लुटल्याची कबुली दिली. त्यांनी धारदार शास्राचा धाक दाखवून प्रवाशांना जबरदस्तीने लुटल्याचे उघड झाले आहे. आदित्य भोसले, चेतन सरोदे दोघे ( रा.गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर) फरार आहेत. तसेच नयन पाटोळे व प्रेम नायर यांचाही समावेश असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान, सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. सर्व आरोपींना सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विष्णु भागवत, गणेश लोंढे, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, बाळु खेडकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड तसेच सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्योती गडकरी, पोसई मंगेश नागरगोजे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते आदींनी बजावली आहे.