मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चाबाबत मोठा खुलासा केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांची मनोज जरांगे यांच्यासोबत भेटीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच, मंत्री उदय सामंत यांच्यासोबतही या विषयावर काहीही बोलणे झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, जर आंदोलकांची चर्चेची तयारी असेल, तर सरकारही चर्चेसाठी तयार आहे. परंतु त्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय असणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत जरांगे पाटलांनी निर्णय घ्यायचा आहे, शासनाची यात कुठलीही भूमिका नाही, सरकारने यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.