अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा) :-मराठा आरक्षणासाठी संघर्षशील नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आपल्या ताफ्यासह मुंबईकडे कूच करत आहे. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. बुधवारी संध्याकाळी जरांगे पाटील यांचा ताफा शेवगाव शहरात दाखल झाला.
यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केले.शेवगावच्या मिरीमार्गे पांढरीपूल आणि शेंडी बायपासमार्गे हा ताफा पुढे सरकला. शेंडी बायपास येथे विशेष उत्सवाचे स्वरूप दिसून आले.स्वागतासाठी तरुणाईने जेसीबी मशीनच्या लोडर मधून पुष्पवृष्टी करत मनोज जरांगे पाटील यांना सलामी दिली.
परिसर ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणांनी दणाणून गेला होता.त्या पुढे दूधडेअरी चौक, नेप्ती चौफुला आणि इतर अनेक ठिकाणी देखील त्यांच्या ताफ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि पाटील-पाटील च्या घोषणा करत उपस्थितांनी आपले समर्थन दर्शवले. पावसाने देखील जोरदार हजेरी लावली होती, परंतु त्याचा कोणताही परिणाम आंदोलनकर्त्यांच्या उत्साहावर झाला नाही.
नेप्ती चौफुला परिसरात नागरिकांनी आंदोलकांना पिण्याच्या पाण्याची आणि नाष्ट्याची व्यवस्था करून आपले योगदान दिले. सायंकाळ होताच परिसरात मराठा समाजबांधवांची गर्दी लक्षणीयरीत्या वाढली. रात्रीच्या जेवणासाठी मसालेभाताची सोय करण्यात आली होती.रात्रभर पावसाची संततधार सुरू असतानाही नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या आगमनाची प्रतीक्षा केली. अखेर पावणे दीडच्या सुमारास ताफा पोहोचताच मोठा जल्लोष करण्यात आला.
फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, आणि घोषणांनी संपूर्ण परिसर थरारून गेला.मराठा समाजाच्या एकतेचा आणि संघर्षाचा एक जिवंत प्रत्यय या प्रसंगातून पाहायला मिळाला. समाजाचा प्रचंड पाठिंबा आणि तरुणाईचा उसळणारा उत्साह पाहता, मराठा आरक्षणासाठीची ही लढाई आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी अबाल वृध्दांसह महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. महिलांनीही जरांगे पाटील यांच्या ताफ्याचे या वेळी स्वागत केले. तसेच आंदोलनकर्त्यांना पाणी व नाटा वाटपात मदत केली.
पोलिस बंदोबस्त मोर्चा मार्गावर
पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनकर्त्यांना पोलिसांसह मराठा बांधवांनी मार्गदर्शन केले. मराठा समाज बांधवांनीही पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सूचनेचे पालन केले.
जिल्ह्यातीलही काहींचा ताफ्यात समावेश
मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात अहिल्यागनर जिल्ह्यातील काहीजणांनी दाखल होत. मुंबईकडे कूच केली. संगमनेरसह अकोले, कोपरगाव, आदी तालुक्यातील मराठा बांधव घारगाव मार्गे पुण्यात जरांगे पाटील यांच्या ताफ्यात दाखल झाले. श्रीगोंदे, जामखेड, कर्जतमधील मराठा बांधव पुण्यात जाऊन जरांगे पाटील यांच्या ताफ्यात दाखल झाले.