शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर शहरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात भ्याड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. विखे पाटील यांनी आरोपीच्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांना इशाराही दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला करण्यात आल्याने शिवसेना गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, आमदार अमोल खताळ यांच्यावरील या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हे हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत का? याची माहिती घेऊन यासंदर्भात चौकशीचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. भ्याड हल्ला करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असा काही लोकांचा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला. तर, दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेशही दिल्याचं त्यांनी म्हटलं.
काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे, त्यांना जर लोकशाही मान्य नसेल, ठोकशाहीच त्यांना मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्तेही त्याच भाषेत उत्तर देतील, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संगमनेरचे राजकीय वातावरण चांगले तापले असून या घटनेमुळे महायुती व महाविकास आघाडीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाची सुरु होण्याची शक्यता आहे. ज्या माथेफिरूनी हल्ला केला आहे. तो सध्या अटकेत आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.