मानोरी(जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या काही दिवसांपासून आरडगाव शिवारात दहशत दहशत निर्माण करणारा एक बिबट्या बुधवारी रात्री अखेर पिंजऱ्यात अडकला. दादासाहेब काळे यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या कैद झाला असून, ही घटना समजताच शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सध्या या परिसरात अजून दोन ते तीन बिबटे फिरत असल्याची शक्यता असून, त्यांच्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. अनेक कुत्रे, शेळ्या व कोंबड्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी
“फक्त एक बिबट्या पकडल्याने दिलासा मिळाला असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. अजूनही परिसरात बिबटे सक्रिय आहेत. त्यामुळे इतर संभाव्य ठिकाणी देखील पिंजरे लावावे,” अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वनविभागाची कारवाई सुरू वनविभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. येत्या काळात आणखी पिंजरे लावून इतर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची तयारी सुरू आहे.