संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- तथाकथित कीर्तनकार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या घुलेवाडी गावामध्ये अनेक दिवसापासून अशांतता व नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. असे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते. घुलेवाडी गाव हे कायम पुरोगामी व वारकरी संप्रदायाच्या विचारांचे राहिले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गावची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सर्व गाव एकत्र आले असून विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना यापुढे वेळीच रोखले जाईल असा एकमुखी ठराव ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर घुलेवाडी येथे झालेल्या प्रकरणात वारकरी संप्रदायातील कीर्तनकार समाज प्रबोधनकार पत्रकार यांनी वस्तुस्थिती चांगली मांडणी करून तथाकथित कीर्तनकाराचा पडदा फाडल्याबद्दल संपूर्ण गावाने या मान्यवरांचे अभिनंदन केले आहे.
मारुती मंदिरा समोरील झालेल्या गावच्या बैठकीमध्ये हा एकमुखी ठराव घेण्यात आला. यावेळी सिताराम राऊत, ह.भ.प.सखाराम महाराज तांगडे,सरपंच सौ.निर्मला राऊत,तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पानसरे,ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कारभारी पानसरे,भास्कर पानसरे,भागवत काशीद, रामनाथ राऊत, मच्छिंद्र ढमाले, ह.भ.प पोपट आगलावे, रायभान राऊत, माजी पंचायत समिती सदस्य सुनील राऊत,उपसरपंच अनिल राऊत, नामदेव गायकवाड,भाऊसाहेब पानसरे,राजू खरात,एकनाथ राऊत,रवि गिरी,चंद्रकांत क्षीरसागर,दत्तू राऊत,अनिल के.राऊत,प्रतिभा ढमाले,माया पराड,शितल राऊत,सुनिल रोकडे,निलेश सातपुते,बाजीराव पानसरे,पल्लवी त्रिभवन,हरि ढमाले, रमेश राऊत आदी सह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून विविध घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेल्या घुलेवाडी ग्रामस्थांनी गावातील अशांतता व नागरिकांमधील अस्वस्थता दूर होऊन पूर्वीचे शांतता व सुव्यवस्थेचे दिवस परत आणण्याकरता एकमुखी ठराव केला आहे. याचबरोबर राज्यभरातील वारकरी संप्रदाय पत्रकार साहित्यिक व पुरोगामी विचारांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सर्वांचा एकमुखी अभिनंदनचा ठराव करण्यात आला. तसेच काही लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी गावांमध्ये जातीय तणाव निर्माण करत असून या शक्तींना वेळीच आपण सर्व मिळून रोखू असा एकमुखी ठराव करताना शांतता सुव्यवस्थेला प्राधान्य दिले.
यावेळी बोलताना सिताराम राऊत म्हणाले की, घुलेवाडी गाव हे पुरोगामी व वारकरी विचारांचे राहिले आहेत. अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने या गावांमध्ये राहत असून विकासाची वाटचाल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जपली आहे. या गावाने तालुक्याला दिशा दिली आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये गावांमध्ये विविध घडामोडी घडल्या असून चुकीच्या गोष्टींमुळे गाव राज्यात चर्चेत आले आहे. अशावेळी सर्व वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रबोधनकार साहित्यिक पत्रकार यांनी सत्याची बाजू घेऊन पुरोगामी विचार भक्कम केला आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. यावेळी संपूर्ण गावाने दहा दिवस दुखावटा धरला आणि प्रवरा नदीवर दहावा घातला असे गांधी विचारावर चालणारे हे गाव आहे. या गावांमध्ये नथुरामांच्या विचारांना कधीही थारा दिला जाणार नाही असे सांगताना विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.
तर ह.भ.प.तांगडे महाराज म्हणाले की, सर्वधर्मसमभाव ही वारकऱ्यांनी,संप्रदायाने दिलेली मोठी देन आहे. मानवतेचा विचार वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदाय कधीही राजकारण करून भेदभाव करत नाहीत मात्र काही लोकांनी यामध्ये घुसखोरी केली आहे. आणि ते उघडे सुद्धा पडले आहेत. ज्यांनी या घटनेच्या प्रपोगंडा केला ती आता सत्य बाहेर आल्यानंतर गप्प बसले आहे. या पुढील काळात संत महात्म्यांचा विचार घेऊन सर्वांनी एकत्रित काम करावे हीच खरी मानवतेची सेवा असल्याचे ते म्हणाले.
कानिफनाथ ट्रस्टीचे अध्यक्ष मच्छिंद्र ढमाले म्हणाले की, घुलेवाडी गावाच्या परिसरात अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्था असून बाहेरगावचे अनेक नागरिक या ठिकाणी स्थायिक झाले आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे मात्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही मंडळी हेतू ठेवून तेढ निर्माण करत आहे. ते लोक जनतेने ओळखले असल्याचे ते म्हणाले.
तर भास्कर पानसरे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला शांतता सुव्यवस्था आणि विकास हवा आहे आणि तो माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण करणार आहोत. आपल्या मधील गटा तटाचा फायदा बाहेरचे लोक घेत असून त्यामुळे घुलेवाडी गाव बदनाम होत आहे. ही बदनामी थांबून यापुढील काळामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन लढू या असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पानसरे म्हणाले की, घुलेवाडी मध्ये होणाऱ्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये नागरिक म्हणून विविध संस्थांमधील कर्मचारी उपस्थित असतात. मात्र त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकाटिप्पणी करणे म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
तर नामदेव गायकवाड म्हणाले की, अमृत उद्योग समूहातील विविध कर्मचारी गावच्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या आपुलकीने सहभागी होत असतात. त्यांच्या सहभागातून गावच्या व्यापारामध्ये नक्कीच वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मानही झाला पाहिजे.