शेवगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-शेवगाव तालुक्यातील देवटाकळी-जोहरापूर रस्त्यावरील देवटाकळी येथील रेडी नदीवरील तात्पुरते बाह्यवळण पुल नदीच्या प्रवाहात तिसऱ्यांदा वाहून गेला असून,ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एकाच ठिकाणी तिसरी वेळ असून तीन महिन्यांत तिसऱ्यांदा हा रस्ता वाहून गेल्याने ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.या पुलावरून वाहतूक बंद झाली आहे.त्यामुळे देवटाकळी येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
जोहरापूर देवटाकळी या मार्गावरील देवटाकळी येथील रेडी नदीच्या पुलाचे काम ठेकेदाराने मे च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू केले होते. त्यावेळेस दळणवळणच्या दृष्टीने शेजारीच बाह्य वळण रस्ता तयार केला होता.२० मेरोजी झालेल्या अवकाळी पावसामध्ये प्रथम बाह्य वळण पूल वाहून गेला होता.त्यानंतर त्याची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी हा पूल पुन्हा सुरू केला होता.मात्र,(ता.१५ )ऑगस्ट रोजी झालेल्या पावसात दुसऱ्यांदा तो पूल वाहून गेला होता.पावसाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहतूक आठवडाभर बंद होती.
देवटाकळी ग्रामस्थांनी (ता.१९)रोजी जलसमाधी आंदोलन केल्यानंतर ( ता.२५) ऑगस्ट रोजी पुन्हा पुल तयार करण्यात आला होता.मात्र, (ता.२८) ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने पुन्हा तिसऱ्यांदा पूल वाहून गेला आहे.त्यामुळे देवटाकळी-जोहरापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.सद्या वाहतूक भातकुडगाव फाटा मार्गे वळवली आहे त्यामुळे वाहन चालकांना सहा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे.
जोहरापूर-देवटाकळी हा रस्ता परिसरासाठी महत्त्वाचा आहे या रस्त्याने मोठी वर्दळ असते.मात्र,नदीवरील जुन्या पुलाचे बांधकाम तोडून नवीन काम पावसाळ्यात सूरू करण्यात आले होते व पर्यायी मार्ग म्हणून जवळून तात्पुरता रस्ता तयार केला.या रस्त्यावरून मोठ्या संख्येने परिसरातील विद्यार्थी या रस्त्याने शेवगाव येथे शिक्षणासाठी जातात.तर वस्तीवरील मुले देवटाकळी येथे शिक्षणासाठी येतात.मात्र,बाह्यवळण रस्ता वाहून गेल्याने त्यांचे शिक्षण पुन्हा थांबले.तसेच अनेकांची शेती नदीच्या पलीकडे असल्याने जनावरांसाठी चारा कसा आणायचा,हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला असल्याचे.सरपंच ज्ञानदेव खरड,संतोष मेरड,बाळासाहेब काळे,रवींद्र खरड,उद्धव मेरड,गोकुळ साळुंखे,किशोर विखे,ऋषिकेश मेरड,सचिन मेरड यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.