कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-कोल्हार येथील सुप्रसिद्ध कै.झुंबरशेठ कुंकूलोळ गणेश मित्र मंडळाने पारंपरिक भारतीय वाद्य, लेझीम व झांज वाजवत तसेच संगीताच्या साथीने बालगोपालांसह नाचत, फुगडी खेळत गणरायाचे जल्लोष स्वागत केले. यावेळी बालगोपाल, अबाल वृद्ध यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. कोल्हार येथील बेलापूर रोड लगत असलेल्या श्री वर्धमान जैन स्थानक समोरील फेज-२ संकुलातील कै. झुंबरशेठ कुंकूलोळ गणेश मित्र मंडळ हे “आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष” हे मध्यवर्ती आशयसूत्र घेऊन ११ वा आनंदोत्सव साजरा करत आहेत.
दरम्यान शनिवार दि. 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक 8 वा. या मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हार बुद्रुक चे मा. सरपंच अॅड सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते झाले. ते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना त्यांनी वरील मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष महेश भाऊ फलटणे यांच्या हस्ते मा. सुरेंद्रभाऊ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुंकूलोळ गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश फलटणे उपाध्यक्ष रवींद्र मंडलिक खजिनदार विशाल शिंदे, मंडळाचे कार्यकारी सदस्य आशुतोष बोरसे संकुलाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ शिंदे, कार्यक्रमाच्या समीक्षक लहारे मॅडम व ईडलवार मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान मा. सुरेंद्र भाऊ पुढे म्हणाले की येथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने एक परिवार असल्यासारखे राहतात. या संकुलातील पर्यायाने अर्थातच या मंडळातील लोक उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत तर काही लोकं कोल्हार मध्ये अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या आपला व्यवसाय करत आहेत आणि त्यामुळेच या मंडळाचे दरवर्षी सातत्याने चांगले लोकाभिमुख उपक्रम राहिले आहेत. संकुलातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रूपाने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांनी यावेळी मंडळाला विनंती केली की पुढच्या वर्षी मंडळाच्या वतीने जेवणावळी कार्यक्रम रद्द करून त्या रकमेतून स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तक रूपी मदत करावी अथवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करावी. भाऊंनी केलेल्या सूचनेचे मंडळाने मोठ्या उत्साहाने स्वागत करून त्यांना पुढील वर्षी हा उपक्रम नक्की राबवण्याची ग्वाही दिली.
दरम्यान याप्रसंगी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संकुलातील अनेक चिमुकल्या तसेच मोठ्या कलाकारांनी आपल्या सुंदर बहारदार नृत्यातून समाजाला एक सुंदर संदेश देत प्रमुख अतिथी तसेच प्रेक्षक वर्गांची वाहवा मिळवली. यावेळी कोल्हार परिसरातील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक .अजितशेठ कुंकूलोळ व त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा कुंकूलोळ यांच्या शुभहस्ते श्री. प्रल्हाद क्षीरसागर गुरूंच्या विधिवात मंत्रघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
जवळजवळ 125 फ्लॅट असलेल्या या संकुलातील गणेश उत्सव बघण्यासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील लोक आवर्जून भेट देतात. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील मंडळाने सहकार साखर कारखाना, बँक, पथपेढी, विविध कार्यकारी सोसायटी यांच्या ‘सहकारातून समृद्धीकडे’ या वचनाप्रमाणे गणपतीच्या मंडपामध्ये भव्य सहकारी साखर कारखान्याचे फ्लेक्सरुपी चित्र लावण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक, क्रीडा आणि बौद्धिक स्पर्धा अशा स्वरूपाचे आनंददायी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्लो सायकल, वन मिनिट शो, नृत्य स्पर्धा, खेळ पैठणीचा, दहीहंडी, सामूहिक हनुमान चालीसा पठण, सामुदायिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सेवा, संगीत खुर्ची, ताट सजावट, तसेच दरवर्षी कोल्हार वासियांचा उदंड प्रतिसाद मिळून आकर्षण ठरलेला फूड फेस्टिवल (फूड स्टाॅल) देखील होणार आहे.
१२५ उंबरे असलेले संकुल म्हणजे एक परिवार असल्यासारखे राहतात. श्री गणेश उत्सव, दहीहंडी, रंगपंचमी, कोजागिरी पौर्णिमा, होळी, श्रीराम जन्मोत्सव, दीपावली, ईद यासारखे सण सामुदायिक रित्या साजरे केले जातात. त्यामुळे सामूहिक साजरे केले जाणारे.
सण-उत्सवाची येथील लोक आवर्जून वाट बघत असतात. कै. झुंबरशेठ कुंकूलोळ गणेश मित्र मंडळ सुसंस्कार, शांतता, शिस्त तसेच नवोपक्रमासाठी कोल्हार पंचक्रोशीत ख्याती प्राप्त आहे. संकुल व्यवस्थापक समिती व गणेश मंडळाची सर्व कार्यकारिणी मोठ्या उत्साहात कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. गणेश उत्सवामुळे येथील वातावरण भक्तिमय होऊन गेले आहे.