राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरीत नगर-मनमाड हायवेवर मराठा आंदोलनाने चक्काजाम; मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुरी शहरात आज (2 सप्टेंबर) सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नगर-मनमाड हायवेवर सकाळी 11 वाजल्यापासून हा जाम सुरू झाला.
“एक मराठा, लाख मराठा” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात रवी भाऊ मोरे, कांता पाटील तनपुरे, मुन्ना शेठ तनपुरे, राजू शेटे, युवा नेते सौरभ उंडे, ताराचंद पाटील तनपुरे, सचिन बोरुडे, सुनील निमसे, राऊ काका तनपुरे, राहुल भैया शेटे, बाळासाहेब उंडे,युवराज तोडमल, भिकू शेठ भुजाडी, भारत भुजाडी, गणेश उंडे, आदींसह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. आंदोलकांनी शांततेत परंतु ठामपणे आपली मागणी मांडली.
कांता पाटील तनपुरे यांनी सरकारवर ताशेरे ओढत म्हटले, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ज्या गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं — ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकून राहिलं होतं. मग आमचं आरक्षण तुम्ही का काढलं? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.”
प्रकाश देठे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले, “मराठा बांधवांनी केवळ रस्त्यावरच नव्हे, तर सोशल मीडियावर, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मार्गांनी आंदोलनास पाठिंबा द्यावा. मराठा आता थांबणार नाही. गनिमी काव्याने सुद्धा आंदोलन करावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही.”यावेळी सचिन बोरुडे, शिवसेना शेतकरी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रवी मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
राहुरीमधील हे आंदोलन शांततेत पार पडले असून, सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.