श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :- शहरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी आज पर्दाफाश केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ‘आदर्श लॉज’वर भरदिवसा टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन महिला, तीन पुरुष आणि लॉज मालकाला ताब्यात घेतले. शिर्डी येथील वेश्या व्यवसाय करणारे ४ हॉटेल वर्षभरासाठी सील करण्यात आल्या नंतर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे देखील अशा अवैध धंद्यांवर कारवाईचा इशारा दिला होता आणि आज ही मोठी कारवाई झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आदर्श लॉजमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. यापूर्वीही अनेक वेळा या लॉजवर कारवाई झाली होती, तरीही हा धंदा बिनदिक्कतपणे सुरू होता. शिर्डीमध्ये देहविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या हॉटेल्स आणि लॉज सील केल्यानंतर श्रीरामपूरमध्ये झालेली ही पहिली मोठी कारवाई आहे. पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे ही मोहीम आखली आणि अचानक छापा टाकून संबंधितांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शहरात चालणाऱ्या इतर अवैध धंद्यांनाही चाप बसण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर शहार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे,पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव,सहायक फौजदार राजेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ आंधळे,अमोल पडोळे,अमोल गायकवाड,आदिनाथ आंधळे,मच्छिन्द्र कातखडे, सचिन दुकळे,महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग आदींच्या पथकाने केली. शिर्डीप्रमाणेच आता श्रीरामपूरमधील हा ‘आदर्श लॉज’ सील होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.