पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा): – पक्षीय संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवार दि ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पारनेर येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात आ .काशिनाथ दाते सर यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांनी दिली आहे.
दरम्यान या होणाऱ्या बैठकीच्या वृत्ताला जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, महिला तालुकाध्यक्षा सुषमाताई रावडे, तालुका युवकाध्यक्ष भास्करराव उचाळे, युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर , जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, युवा नेते विजु औटी, महिला जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे सर, जिल्हा सरचिटणीस नितीन म्हस्के, तालुका युवक उपाध्यक्ष शिवराज कदम व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .
बैठकीच्या अनुषंगाने पक्षाच्या सभासद नोंदणीचा आढावा घेणे, विधानसभा निवडणुकीनंतर तालुका राष्ट्रवादीत अनेक मान्यवरांनी प्रवेश केलेला असून, पुर्वीच्याही कार्यकर्त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची दखल घेवून संघटनेतील विविध पदांच्या माध्यमातून जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा या बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून कुणावर कुठल्या पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या बैठकीत संघटनेच्या मुख्य, महिला, युवक, युवती व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी निश्चित करून जाहीर करण्यात येणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लक्षात घेता या होणाऱ्या निवडीतून पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचेही तालुकाध्यक्ष कळमकर यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सातत्याने समाजाच्या, संघटनेच्या विकासात्मक वाटचालीत भागीदार राहिले असून तालुक्याच्या राजकारणाचे, संघटनेच्या बळकटीकरणाचे ध्येय लक्षात घेवून या बैठकीसाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन युवक तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे यांनी केले आहे.