पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा);- देवाने मनुष्याला दिलेले शरीर हे मोबाईल सारखे आहे , त्यात आत्मा हे एक सिम कार्ड आहे , त्याचा रिचार्ज संपला की , आपले कार्य संपले , असे प्रतिपादन हभप रविंद्र महाराज पिंपळगावकर यांनी केले आहे .
दरोडी येथे ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या ७ व्या चरणात संगमनेर चे प्रसिद्ध किर्तनकार हभप रविंद्र महाराज पिंपळगावकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली , त्यावेळी ते पुढे म्हणाले की , देशात नरेंद्र , राज्यात देवेंद्र व आता किर्तन माझे रविंद्र चे , कोणत्याही भेटीला योगायोग लागतो , त्याशिवाय कोणतेही गोष्ट शक्य होत नाही .
प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू आहे , त्याचा चांगल्या कामांसाठी वापर करा . माणसाला सगळे असून ही नीट वागता येत नाही . आपल्याला अग्णी , पाणी यातील देव कळला , पण माणसातला देव कळला नाही . या गावात ३९ वर्षात आजअखेर ३१२ च्या आसपास किर्तन होवून गेले असतील , या किर्तन सेवेसाठी गावात अनेक महाराज येऊन गेले . प्रत्येकाने भजन हे आई वडिलांचे करा , तरच देव भेटेल . ज्याकडे आई , वडील आहे , त्याच्याकडे सकल तीर्थ आहे . कोठेही तीर्थाला जाऊ नका , आई , वडीलांची सेवा करा , जगात सर्वांत श्रेष्ठ भक्ती त्यांचीच आहे . साक्षात पंढरीचा विठ्ठलाला भक्त पुंडलीकाने आई , वडीलांच्या दर्शनाकरिता बोलावले , जन्म देणारी आई ही रुक्मिणी माता असून जन्म देणारे वडील हे विठ्ठल आहे .
संतांच्या मागणीत व आपल्या मागणीत फार मोठा फरक आहे . आपण देवाकडे स्वतः साठी काही मागितले , तर काही च मिळणार नाही . पण जगाच्या कल्याणासाठी देवाकडे काही मागा लगेच मिळेल . आज नोकरी वाल्यापेक्षा शेतकरी श्रीमंत आहे . शेतकरी ताजे पाणी , ताजे अन्न खातो . शेतकरी कधी ही रिटार्यड होत नाही . तसा नोकरी वाले वयाच्या ५८ व्या वर्षी रिटार्यड होतो . शहरात जीवन जगणे खूप अवघड आहे . गावाकडे खूप चांगले जीवन आहे . या मुंबईतील नोकरी वाल्यांनी मुंबईत मराठा मोर्च्याला गेलेल्या लोकांना जेवण दिले नाही , पण शेतकर्यांनी एवढे अन्न पाठविले की , महिन्या भर पुरेल . तरुणांनी राजकीय नेत्यांच्या नादाला लागू नका , यांचा प्रचार करू नका , काम धंदे करा . आपल्यात एकी ठेवा , वाद , भांडणे , भावकी , संघटना बाजूला ठेवा , गावचा विकास करा , कोणी म्हणते , माझा बाप आमदार आहे , खासदार आहे , पण मी म्हणतो , माझा बाप इमानदार शेतकरी आहे . शेतकरी तोट्यात जाऊन देखील शेती पिकवतो , कारण माझा देश उपाशी राहू नये , हा उद्देश ठेवून इमानदारी ने काम करतो . कोणत्याही व्यावसायिकाने , व्यापाऱ्याने कधी कोणाला काही फुकट दिले का , माझा शेतकरी शेतात आल्यावर पिशवी भर फुकट शेतातील माल देतो . शेतकऱ्याची हेळणा करू नका . त्याला सन्मान द्या . सप्ताह उठेपर्यंत आपण खूप सज्जन , नंतर व्यसनामुळे दुर्जन होतो . गावात सप्ताह साजरा करण्यामागे गावातील लोक सुधारले पाहिजे , पण आज महाराज लोकंच सुधारले .
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ५६ भाषा एकत्र केल्या व ओव्या लिहिल्या . त्यामुळे आपल्याला मराठी भाषेचा अभिमान पाहिजे , मराठी भाषेतच बोलले पाहिजे . आई या शब्दाचा अर्थ आदि शक्ती ची माया , ताकद होय . येथून पुढे मुलांनी आईला मम्मी म्हणण्याऐवजी आई म्हणावे व वडीलांना पप्पा म्हणण्या ऐवजी बाबा म्हणावे . संस्कृती , धर्म टिकवायची असेल , तर मोबाईलवर , टि व्ही पासून दूर रहा . मोबाईल ज्ञानाची वस्तू आहे , पण त्याचा दुरूपयोग करू नका . राज्यात साडेतीन शक्तिपीठे नसून साडेचार शक्ती पीठे आहेत , ते म्हणजे जिजाऊंचे , तर १२ ज्योतीलिंग नसून १३ आहेत , ते छत्रपती शिवाजी महाराजां चे एक आहे . सुर्य जर उगवला नसता , तर आकाशा च्या रंग कळला नसता , तसेच छत्रपती शिवाजी महाराजां चा जन्म झाला नसता , तर हिंदू धर्माचा अर्थ कळला नसता . हे रक्त छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी राजे , वारकऱ्यांचे आहे .
बहिणींनी भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागू नका , भावांनी ही बहिणींना काही कमी पडू देऊ नका . नाते फक्त रक्षाबंधन पुरते ठेऊ नका . एकमेकांना जीव लावा . ज्यांच्या गळ्यात तुळशी ची व रुद्रक्षाची माळ आहे , मेल्यावर त्याच्या गळ्याला हात लावण्या ची ताकद जगाच्या बापात नाही , असे ही हभप रविंद्र महाराज पिंपळगावकर शेवटी म्हणाले .
यावेळी हभप रविंद्र महाराज पिंपळगावकर यांचा सन्मान पावडे बाजीराव पाटील व धोंडीभाऊ शेळके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला , महाप्रसादाचे मानकरी वैष्णव किसनराव पावडे पाटील व या अखंड हरिनाम सप्ताहाला वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील व दैनिक पारनेर समर्थच्या कार्यकारी संपादक सौ . निलम खोसे पाटील या पत्रकार दाम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला . या प्रसंगी लकी ड्रॉ विजेत्या महिलांना पैठणी साडी व संत ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला . सुत्रसंचालन खरेदी विक्री संघाचे संचालक संग्राम पावडे यांनी केले .
यावेळी हभप. रविंद्र महाराज पिंपळगावकर यांनी दरोडीचे भूमीपुत्र व मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी हभप किसनराव पावडे पाटील यांच्या कार्याचा गुण गौरव केला