कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना तसेच कोल्हार मेडिकल असोसिएशन व साईबाबा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.शंकरनाना खर्डे पाटील यांच्या 89 व्या जयंती निमित्त सलग पंधरावे रक्तदान व मोफत रक्तगट तपासणी शिबिर श्री भगवती माता मंदिरात पार पडले यावेळी जनजागृतीसाठी नेत्रदान फार्म ही भरून घेण्यात आले. याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की स्वर्गीय शंकर नाना खर्डे पाटील हे खऱ्या अर्थाने एक चालत बोलत न्यायपीठ होत, गावातील अनेक प्रकारचे वादविवाद तंटे सोडविण्याचा त्यांचा हातखंडा होता. गावातील सर्व समाजातील लोकांसाठी त्यांचा शब्द हा प्रमाण होता ते दूर दृष्टिकोन ठेवून सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व होत. आज त्यांची पदोपदी उणीव जाणवत आहे.स्वर्गीय शंकर नानांनीच गावकरी तसेच जवळच्या मित्रांना हाताशी धरून वर्गणी गोळा करून न भूतो न भविष्यती अशा भव्य भगवती माता मंदिर जीर्णोद्धाराचा दृढ संकल्प करून पाया रचला. त्यांच्या दृढ संकल्पाचे प्रतीक म्हणूनच आज श्री भगवती मातेचे भव्य मंदिर येथे उभे आहे. हे नव्या पिढीने कायम लक्षात ठेवावे. आज त्याच धर्तीवर गावातील सर्व मंदिरे अद्यावत झाली आहेत.
राज्यातील तसेच पर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने व श्रद्धेने दर्शनासाठी येथे रांगा लावतात. आणि त्यामुळेच पर्यायाने येथील बाजारपेठ फुलत असताना गावातील काही उपद्रवमूल्य नविन पिढीच्या वागण्यामुळे गावाचे गावपण तसेच व्यापार पेठ टिकवणे एक आव्हान ठरत असुन हि सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे ते यावेळी म्हणाले .दरम्यान याप्रसंगी अन्सार लतीफ शेख याने सलग पंधरा वर्षांपासून रक्तदान केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ.जयराम खंडेलवाल होते. याप्रसंगी कृषीभूषण प्रभावती घोगरे, लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, अनिल खर्डे, डॉ. सुनील खर्डे, शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे , संपतराव खर्डे,डॉ.गुगळे, डॉ. शेखर बोऱ्हाडे, संजय शिंगवी हेमंत रांका,अतुल रांका, निलेश शिंगवी,अजित राऊत, तुषार बोऱ्हाडे ,बाळासाहेब अंभोरे, नंदकुमार भटेवरा, शिवकुमार जंगम, सुरेश पानसरे,शेख सर, दिलीप बोरुडे तसेच ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.