राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता नगरपालिकेच्या आगामी नगराध्यक्ष पदासाठी निघालेल्या सोडतीतून नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गासाठी राखीव झाला असून ओबीसी पुरुष व महिलांना या पदासाठी उमेदवारी करता येणार आहे.याआधी जनतेतून झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ. ममता राजेंद्र पिपाडा यांना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा दोनदा मान मिळाला होता.
सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये राज्यातील महानगरपालिका,नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या नगराध्यक्ष पदाच्या सोडती काढण्यात आल्या यामध्ये राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षण घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील ओबीसीच्या इच्छुकांची आपल्या गटातील नेत्यांची संपर्कासाठी धावपळ सुरू झाली आहे.गेल्या ४ वर्षापासून प्रशासक यंत्रणेमार्फत पालिकेचा कारभार सुरू असल्याने आगामी पालिकेच्या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष होण्याची अनेकांची स्वप्नपूर्तीसाठी तयारी सुरू झाली आहे.
भाजपाचे ना.राधाकृष्ण विखे पाटील गट,राष्ट्रीय काँग्रेस ना.थोरात गट डॉ. राजेंद्र पिपाडा गट तसेच शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदाचे वेध लागले असून यामध्ये माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर,डॉ. स्वाधीन गाडेकर,मिलिंद बनकर,सचिन गाडेकरस्वप्निल गाडेकर, भगवान टिळेकर,दशरथ तुपे, प्रवीण सदाफळ(बोरकर) राजेंद्र पठारे, तसेच या खेरीज सर्वच गटातून अनेक महिला व पुरुष इच्छुकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
सध्या तरी भावी नगराध्यक्ष कोणत्या गटाचा आणि कोण होणार या चर्चेला मात्र मोठे उधाण आले आहे. मात्र विशेषतः राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. परंतु नामदार विखे कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदासाठी निवड करतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.



