शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डी येथे येत्या 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणारी शिव महापुराण कथा ही देशातील सर्वात मोठी व भव्यदिव्य ठरणार असल्याचा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. या कथेचे आयोजन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध प्रवचनकार प्रदीप मिश्रा महाराज हे पाच दिवस भक्तांना अध्यात्मिक प्रवचनांनी मार्गदर्शन करणार आहेत.
या कथेचे ठिकाण शिर्डी येथील अस्तगाव माथा परिसरात असणार असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, भाविकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग आणि इतर सोयी-सुविधा जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
या कथेचे विशेष आकर्षण म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम दर्शनाचा देखावा, जो अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साकारण्यात येणार आहे. देशभरातील विविध प्रांतांमधून येणाऱ्या भक्तांसाठी हा एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
११ ऑक्टोबर रोजी प्रदीप मिश्रा महाराजांचे शिर्डीत आगमन होणार असून, शिर्डी आणि राहता शहरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर ते लोणी येथील डॉ. विखे पाटील यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार असून, १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान दररोज दुपारी एक ते चार या वेळेत कथा होणार आहे.
महाराष्ट्रात प्रदीप मिश्रा महाराजांची ही कथा विशेष ठरणार आहे, कारण पावसामुळे रद्द झालेल्या त्यांच्या पूर्वनियोजित तीन कथांनंतर हीच पहिली कथा महाराष्ट्रात पार पडणार आहे. मिश्रा महाराजांच्या प्रत्येक प्रवचनास तीन ते चार लाख भाविक उपस्थित राहतात, त्यामुळे या वेळी शिर्डीत लाखो भाविकांचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शिर्डी येथील अस्तगाव माथा ही कथा ही केवळ धार्मिक सोहळा नसून, अध्यात्म आणि एकतेचा उत्सव ठरणार आहे. भक्तांसाठी हे एक अविस्मरणीय अध्यात्मिक पर्व असेल. देशातील सर्वात मोठी शिव महापुराण कथा म्हणून याची नोंद होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिर्डी व अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेने उजळून निघणार आहे.