पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या सभापती पदांचे आरक्षण सोडत काल मंगळवारी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात चिठ्ठी पद्धतीने काढण्यात आले. यात पारनेर पंचायत समितीचे सभापती पद हे महिलांच्या खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील अनुसूचित जाती व जमाती यांच्या जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून तो आज बुधवारी देण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवार दि . 10 रोजी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध होणार असून दि. 13 रोजी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणाचे आरक्षण पारनेरच्या तहसिल कार्यालयात काढण्यात येणार आहे.
दि. 14 ला जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करतील. गतवष पारनेरच्या सभापती पदावर वाडेगव्हाण गणातील सदस्य गणेश शेळके हे कार्यरत होते. यंदा मात्र खुला प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार असल्याने अनेक पुरुष इच्छुक व भावी सभापतींचा हिरमोड झाला आहे.
पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनेक राजकीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते, पण सभापती पद हे महिलेसाठी आरक्षित झाल्याने नेते मंडळी हिरमुसले आहेत. तरी देखील स्वत: नाही, तर पत्नीला पंचायत समितीच्या सुरक्षित गणात उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
जिल्हा परिषदेसाठी इच्छुक महिलां उमेदवारांमध्ये प्रामुख्याने खा. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, त्याचबरोबर निर्मला सुनिल थोरात, प्रमिला रघुनाथ खिलारी, सुप्रिया साळवे, सोनाली संदीप सालके, सुधामती विठ्ठलराव कवाद, डॉ. पद्मजा श्रीकांत पठारे, सुषमा रावडे, डॉ. कोमल भंडारी या व इतर महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. पण त्यासाठी या महिलांना पंचायत समितीच्या गणात उभे राहून निवडून यावे लागेल, हे मात्र तितकेच खरे.



