संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका चौदा वर्षीय शाळकरी मुलगीवर अचानक हल्ला करून तिला गंभीरित्या जखमी केले असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावामध्ये शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या मुलीवरती हल्ला केल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते वनविभागाने तात्काळ उपयोजना राबवून या भागात धुमाकूळ घालणारे दोन बिबटे जेरबंद केले आहे.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील प्रगती सखाराम श्रीराम वय १४ ही आज शनिवारी सकाळी सात वाजता घरून गावात शाळेत जात होती. ती खेमनर वस्तीजवळ आली असता कपाशीच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला.
ही घटना गावातील देवराम खेमनर यांनी पाहिली आणि त्यांनी त्या मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र बिबट्याने तिच्या मानेला चावा घेतला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. त्या वेळी खेमनर यांनी घटनास्थळी थांबून कापडयाने जखम बांधून घेत रक्तस्त्राव बंद केला आणि तिला तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले मात्र त्याठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे त्या मुलीला संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे आदेश दिले तसेच जखमी मुलीला आवश्यक ती लस आणि उपचार तातडीने उपलब्ध करून देण्या बाबतच्या सूचना दिल्या.या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ यांनी कुटे हॉस्पिटल येथे भेट देऊन जखमी मुलीच्या आई-वडिलांशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे, शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे, भाजपा युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, राहुल भोईर, पुणेकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बिबट्याने शालेय विद्यार्थिंनिवर केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मागील विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा आपण विधानसभा अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिला होता.तसेच बिबट्यांचे ट्रॅकिंग व नसबंदी करण्या बाबत पाठपुरावा केलेला आहे.त्याबाबत संगमनेर तालुक्यातील आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील बिबट्या नसबंदीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आलेला आहे.लवकरचं याबाबत कृती करण्यासाठी वनमंत्री व सर्व प्रमुख अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार आहे
अमोल खताळ (आमदार संगमनेर विधानसभा)
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील एका शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला केला त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते या भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या तात्काळ जेरबंद करण्यात यावा अशी मागणी डिग्रस ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती त्यांनी तात्काळ सदरच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावा अशा सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार वनविभागाने तात्काळ उपयोजना राबवून खेमनर वस्ती पासून तीन चारशे फूट अंतरावर असणाऱ्या एका गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले असून पिंजऱ्यात टाकून त्यांना संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे
सुभाष सांगळे (वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर)