पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- नगर जिल्हाधिकारी कार्यालयात पारनेर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती च्या १० गणांचे आरक्षण जाहीर झाले असून पुरुष नेते मात्र या आरक्षण सोडतीने हिरमुसले आहेत . पंचायत समिती गणांच्या आरक्षणा वर हरकत घेण्यासाठी दि. १७ पर्यंत वेळ देण्यात आली आहे .
पारनेर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट टाकळी ढोकेश्वर सर्व साधारण महिला , ढवळपुरी सर्व साधारण महिला , जवळा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पुरूष , निघोज नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष , सुपा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी राखीव झाले आहेत .
पारनेर तालुक्यातील १० पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत काढण्यात आली असून टाकळी ढोकेश्वर गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , कर्जुले हर्या गण सर्वसाधारण , ढवळपुरी गण अनुसूचित जमाती महिला , भाळवणी गण सर्वसाधारण , जवळा गण सर्वसाधारण महिला , कान्हुर पठार नागरिकांचा मागासवर्ग , निघोज गण सर्वसाधारण , अळकुटी गण सर्वसाधारण महिला , सुपा गण सर्वसाधारण महिला , वाडेगव्हाण अनुसूचित जाती सोडत काढण्यात आल्याने पुरुष नेत्यांनी जोरदार पणे आरक्षणाला गृहीत धरून राबविलेली प्रचार मोहिम यामुळे थांबली असून मी स्वतः नाही , तर घरातील महिला असे लगेच धोरण हाती घेतले आहे .
यात खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचा हक्काचा टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी जिल्हा परिषद गट हे दोन्ही सर्वसाधारण तेही महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची व पारनेर तालुक्यातील भाजपा चा चेहरा म्हणून ओळखले जाणारे राहुल शिंदे यांचा सुपा जिल्हा परिषद गट ही इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना ही हा मोठा धक्का मानला जातो . सुपा गटाच्या सदस्या राणी लंके यांना मात्र सोपे झाले आहे . झावरे व शिंदे यांना घरातील महिलांना उमेदवारी देऊन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी लागेल .झावरेंना त्यांचा संपर्क असलेला शेजारील जवळा गटातून निवडणूक लढविण्याचा पर्याय उपलब्ध आहे . तर निघोज गटात मात्र जैसे थे परिस्थिती राहिल्याने येथे भाजपा उमेदवाराला वातावरण चांगले राहिल , येथे सचिन वराळ भाजपाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जातात .पण त्याचबरोबर दिनेश बाबर , मधुकर उचाळे ही इच्छुक असल्याने उमेदवारीची रंगत निर्माण होणार आहे . याविरुद्ध उबाठा चे इच्छूक उमेदवार व खा . निलेश लंके यांना मानणारे डॉ . भास्करराव शिरोळे गेल्या अनेक वर्षांपासून मतदारांच्या सुख, दुःखात सहभागी होणारे म्हणून त्यांची ओळख आहे . तर जवळा जिल्हा परिषद गटात भाजप कडून विश्वनाथ कोरडे प्रबळ उमेदवार म्हणून ओळखले जातात , पण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत ही इच्छुक असल्याने , जर युती झाली , तर उमेदवार नक्की कोण ? भाजप की राष्ट्रवादी ? येथून उबाठा चे डॉ . श्रीकांत पठारे ही इच्छुक असल्याने येथे मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे .
पारनेर तालुक्यात एकूण मतदारांची संख्या २ लाख ३८ हजार २१४ असून त्यातील पुरुष १ लाख २२ हजार ३६५ व स्त्री १ लाख १५ हजार ८४९ आहे . स्त्री व पुरुष मतदारांची संख्या जवळपास सारखीच आहे .
पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही खा . निलेश लंके विरुद्ध माजी खा . सुजय विखे , आ . काशिनाथ दाते अशी फिरणार आहे . या निवडणूकी कडे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते . ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आर्थिक कणा असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था होय .