सातारा(जनता आवाज वृत्तसेवा):- सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. येथील कार्यरत महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या डॉक्टरने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिकांपासून वैद्यकीय संघटनांपर्यंत सर्व स्तरांवर या घटनेबाबत दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या कालावधीत त्यांना प्रचंड मानसिक ताणाचा सामना करावा लागत होता, अशी माहिती सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. संबंधित चौकशी दरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली होती.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मृत डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळली असून, त्यात त्यांनी दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर मुंडे यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला. या धक्कादायक खुलाशामुळे सातारा जिल्ह्यात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर काही काळ पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. त्याच दरम्यान त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच उच्च पदस्थ पोलिस अधिकारी फलटण येथे दाखल झाले असून, सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तपासणी, तसेच डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी पोलिसांवर बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉ. मुंडे यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट असून, महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, डॉ. मुंडे यांनी यापूर्वीही या प्रकरणी तक्रार केल्याचे समजते. त्यात माझ्यावर अन्याय होत आहे, मला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांनी त्या पत्रात नमूद केले होते. मात्र, त्यांच्या या पत्राची दखल घेतली गेली नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे अखेरीस त्यांनी निराशेतून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची नोंद फलटण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस या घटनेचा सर्वांगीण तपास करत आहेत. आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा सखोल तपास सुरू आहे. या बाबत तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीतील दबाव, प्रशासकीय ताण किंवा वैयक्तिक कारण, हे तपासानंतर स्पष्ट होईल. या घटनेनंतर आरोग्य विभागातही हालचाली सुरू झाल्या असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णसेवेचा ताण, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि सततच्या चौकशींचा दबाव या ताणतणावाखाली अनेक डॉक्टर आणि परिचारक कार्यरत असतात. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे या समस्या किती गंभीर आहेत, हे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय संघटनांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तणावनिवारण आणि समुपदेशनाच्या ठोस योजना राबवाव्यात. तसेच, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून न्याय मिळवावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
प्रशासकीय स्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण मानसिक छळ या संबंधाने पूर्व प्रतिबंधात्मक कारवाया जर आधीच केल्या गेल्या तर आत्महत्ये इतकी अगतिकता येणार नाही. पुण्यामध्ये पीआय विजय मला पवार यांनी भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली पण त्यानंतर विजय मला पवार यांच्यावर ज्या पद्धतीचा दबाव आला आणि आयुक्तांनीच त्यांना जबरदस्तीने बदली घेण्यासाठी प्रयत्न केले शेवटी या महिलेला मॅचचे दरवाजे ठोठवावं लागले. यानिमित्ताने कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा त्रास हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
सातारा येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. सातारा पोलिसांना आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फलटण शहर पोलिसांकडे भादंविच्या कलम ६४(२)(एन) आणि १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी गोपाळ बडणे आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोध पथक रवाना करण्यात आले आहे.
डॉक्टरच्या आतेभावाने सांगितल्याप्रमाणे, मृत डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती. मागील वर्षभरात तिच्यावर सतत राजकीय आणि पोलिस दबाव होता. तसेच, पोस्टमार्टेम करताना अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून तिला आवश्यक त्या प्रकारचे रिपोर्ट देण्याचे दबाव होत होते. डॉक्टरने दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना पत्र लिहून या सर्व त्रासाबाबत माहिती दिली होती, ज्यात पोलिस निरीक्षक महाडिक आणि गोपाल बदने तसेच खासदारांच्या पीएंचा उल्लेख होता. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नव्हती.
त्यांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्य सरकारने तात्काळ हालचाल केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवून, या प्रकरणातील दोन्ही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेला अत्यंत गंभीर मानत, महिला डॉक्टरवर अन्याय झाल्यास सरकार गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून दोषींना शिक्षा मिळेल, अशी हमी दिली आहे.




