spot_img
spot_img

स्वागत करण्याऐवजी आत्मक्लेश करणे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण;फंड व नवले यांनी आंदोलकांना फटकारले

श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक होत असताना त्याचे मोठ्या मनाने स्वागत करण्याऐवजी आत्मक्लेश करणारे, अनावरणाच्या कार्यक्रमाचा निषेध करणे हे ‘संकुचित’ मनोवृत्तीचे प्रदर्शन असून श्रीरामपूरचे राजकारण किती खालच्या थराला चालले याचे हे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी जि.प.सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात न बसवता भाजी मंडईसमोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा आयोजित केला गेला याचा निषेध करण्यासाठी काल श्रीरामपूर नगरपालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस व उबाठा शिवसेनेच्यावतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

याबाबत संजय फंड आणि शरद नवले यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एवढया मोठ्या स्मारकाला जागा पुरणे शक्य नाही, हे सर्व माहीत असून केवळ विरोध करणे हे निंदनीय आहे. वास्तविक पाहता स्वतःला हिंद म्हणवणाऱ्यांनी निषेध नोंदवणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.

दुसऱ्या कोणी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला असता तर एकवेळेस ती बाब समजू शकतो परंतु, हिंदू म्हणवणाऱ्यांनीच महाराजांचा पुतळा उभारत असताना आत्मक्लेश करणे आणि निषेध करणे यावरून कोणत्याही गोष्टीत राजकारण करणे आणि लोकांची दिशाभूल करणे, एवढे एकच काम शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसचे नेते करत आहेत.

गेल्या ४० वर्षात अनेक वर्षे काँग्रेसचे मुख्यमंत्री राहीले, श्रीरामपूरचे आमदार काँग्रेसचे होते. पालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. तेव्हा छत्रपतींचे स्मारक का झाले नाही? मध्यंतरी उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री झाले होते. दोनदा शिवसेनेचे मुख्यमंत्री होऊनही श्रीरामपुरात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा स्मारक का उभारता आला नाही? स्मारक करायला त्यांचे हात कोणी बांधले होते का? ज्यांनी कित्येक वर्षे महाराजांचा पुतळा गोडाऊनमध्ये ठेवला होता त्यांचे अनुयायी आत्ता निवडणुकीच्या तोंडावर आत्मक्लेश करण्याचे नाटक करत आहेत. असे आंदोलन करून स्वतःच्या बालिशबुद्धीचे प्रदर्शन ते या निमित्त करत असल्याने श्रीरामपूरची जनता अशा प्रकारे छत्रपतींच्या पुतळयाच्या अनावरणाच्या अगोदर आत्मक्लेश करून अपशकून करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कदापि माफ करणार नाही, असे सांगत माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी म्हटले आहे.

.वास्तविक पाहता गेल्या ४० वर्षापासूनचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शहरात हिंदू धर्मियांच्या भावनाचा आदर होत आहे,याचे कौतुक होणे गरजेचे आहे, असेही फंड व नवले यांनी म्हटले आहे

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने होणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकाच्या कोनशिलेवर आ. हेमंत ओगले, मा. नगराध्यक्ष अनुराधा आदिक, मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची नावे टाकलेली आहेत. कोनशिलेवर ज्यांची नावे आहेत. त्यापैकी आ. ओगले आणि ससाणे यांनी काल आत्मक्लेश आंदोलन केले.याच्याइतकी श्रीरामपूरकरांसाठी शोकांतिका नाही, अशी खंत फंड आणि नवले यांनी व्यक्त केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!