spot_img
spot_img

घारगांव हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधीत 4500 किलो मांगुर मासा जप्ती कारवाई, 14,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेस यश

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-घारगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधीत 4500 किलो मांगुर मासा जप्ती कारवाई, 14,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेस मोठे यश आले आहे.

माहिती अशी की, सोमनाथ घार्गे , पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि.दिपक मेढे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, भिमराज खर्से, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, आकाश काळे, भगवान धुळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन संगमनेर तालुका हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी पथकास रवाना केले.

नमुद पथक दिनांक 02 रोजी घारगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत ट्रक क्रमांक WB25M5048 यामध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन तो पुणेच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ घारगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर यांना बोलावुन घेवुन नांदुरखंदरमाळ शिवारामध्ये सापळा रचुन ट्रक क्रमांक WB25M5048 हा ताब्यात घेवुन त्यामध्ये खात्री केली असता ट्रकचे केबिनमध्ये प्रतिबंधीत मांगुर मासे असल्याचे आढळुन आले. ट्रकमध्ये मिळुन आलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे  सुकुमार दुलाल घोष वय 47 वर्षे, रा. पुतीया, नॉर्थ 24 परगना, पुतीया, पश्चिम बंगाल,  तारक दिलीप सरकार वय 27 वर्षे, रा. नेहरुबाग, रेल्वेलाईन, हाबरा, नॉर्थ, 24 परगना, पश्चिम बंगाल,  सद्दाम रजरुल सरदार वय 33 वर्षे, रा. बारघरीया, सरुफनगर थाना, नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल,  अझरुल आयजुल मंडल, वय 36 वर्षे, रा. बारघरीया, सरुफनगर थाना, नॉर्थ 24 परगना, पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडे त्यांचे ताब्यात मिळुन आलेले मांगुर मासे कोठुन आणले आहे व कोणाकडे घेवुन जाणार आहे याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचे मासे हे मोंन्टु मंडला, रा. मोगरा, बागजुला, बाटुडिया, जि. बाशिरहट, पश्चिम बंगाल याने भरुन दिलेले असुन ते गणेश गायकवाड, रा. पुणे पुर्ण पत्ता माहित नाही याचेकडे घेवुन जात असल्याची माहिती दिली.

त्यानंतर पथकाने प्रतिबंधीत मांगुर माशाने भरलेला ट्रक खात्री कामी घारगाव पोलीस ठाणे येथे नेवुन मत्स विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांचेशी संपर्क करुन ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमधील माशांची खात्री करणेकामी संपर्क केला असता सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर व श्री दत्तात्रय संजय मिसाळ अशांनी दिनांक 03 रोजी घारगांव पोलीस ठाणे या ठिकाणी येवुन नमुद ट्रकमधील माशांची खात्री केली असता त्यामध्ये प्रतिबंधीत मांगुर मासे असल्याचा अभिप्राय दिला.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,50,000/- रुपये किमतीचे 4500 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 10,00,000/- रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 14,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत.

ताब्यातील इसमांविरुध्द मत्स विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर, मत्सव्यवसाय विकास अधिकारी, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 320/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास घारगांव पोलीस ठाणे करीत आहेत.

सदरची कारवाई . सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व घारगांव पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!