मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या निवडणुकीत २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषदेतून नगरपालिका, नगरपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून निवडणूकींची तयारी सुरु करण्यात आली होती. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाची निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत असून, आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग तीन टप्प्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याचे समजते. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसऱ्या तर मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांमुळे रखडल्या होत्या. त्यानंतर आता या निवडणुकांची घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत होते का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.



                                    