श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपूरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. श्रीरामपूर शहरातील कुंभार गल्ली परिसरातील शेतकरी दिपक लक्ष्मण डावखर (वय ५३) यांनी आपल्या आई, बहिणी, मेहुणे तसेच काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्त नोंदणी व धमकावणे याबाबत गंभीर आरोप करत श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डावखर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची नवीन गट क्र. 100/9, क्षेत्रफळ 3.71 हेक्टर ही शेतजमीन वडील लक्ष्मण परशुराम डावखर यांच्या सन 2011 मधील मृत्युपत्राद्वारे त्यांच्या नावावर झाली होती. या जमिनीचा 7/12 उतारा व मालकी नोंद आजही त्यांच्या नावावर आहे. तरीसुद्धा कुटुंबातील काही सदस्यांनी आणि बाहेरील उद्योजकांनी संगनमत करून कोर्टाच्या स्थगित आदेशाची पायमल्ली करत खोटा “आपसमजुतीचा करार” नोंदवला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
डावखर यांनी स्पष्ट केले की, त्यांची सख्खी आई सुशिलाबाई लक्ष्मण डावखर व बहीणी वैशाली शिवराम साठे, अर्चना भास्कर दिघे यांनी इतर काही नातेवाईक व उद्योजक शेख अंजुम परवेज मुसा अहमद, पत्नी शेख समीना अंजुम, मुलगा शेख अंजर अंजुम (रा. नफीस पॅलेस, श्रीरामपूर) यांच्या संगनमताने हा व्यवहार केला. या व्यवहारात एक कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
फिर्यादीनुसार, ५ जानेवारी २०२३ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवताना त्यांची व बहीण मीना प्रभाकर खर्डे यांची कोणतीही सही किंवा संमती न घेता अपूर्ण वंशावळ दाखवून बोगस दस्त नोंदविण्यात आला. न्यायालयीन खटला सुरू असतानाही सब-रजिस्ट्रार कार्यालयाने हा दस्त नोंदवला, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच फिर्यादी डावखर यांनी नमूद केले की, यापूर्वी सन 2021-22 मध्ये विलास सासे आणि अनिल इंगळे यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहारात ठरलेले धनादेश न वटल्याने व्यवहार अपूर्ण राहिला. मात्र त्याच जमिनीचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी संबंधितांनी त्यांना धमकावले आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
डावखर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,
“माझ्या मालकीची जमीन खोटी कागदपत्रे तयार करून विकली गेली आहे. माझ्या व बहीण मीना खर्डे यांच्या संमतीशिवाय बनावट दस्त नोंदवून आमची फसवणूक करण्यात आली. तसेच या प्रकरणी सहभागी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी,”
अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदर प्रकरणात १) वैशाली शिवराम साठे, २) अर्चना भास्कर दिघे, ३) जनाबाई ऊर्फ बबई लक्ष्मण डावखर, ४) सुशिलाबाई लक्ष्मण डावखर, ५) अनिल माणिक इंगळे, ६) विलास अशोक सासे, ७) शेख अंजुम परवेज मुसा अहमद या सात जणांविरुद्ध कारवाईची मागणी फिर्यादीने केली आहे.
या तक्रारीनंतर श्रीरामपूर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून दस्त नोंदणी प्रक्रियेत सब-रजिस्ट्रार कार्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वारसाहक्कातील वाद, कोर्टाचे स्थगित आदेश, आणि नातेवाईकांशी संगनमत करून झालेल्या या कथित फसवणुकीमुळे श्रीरामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होईल.



