लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- लोणी येथील अजय ज्वेलर्सच्या मालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दुकान लुटणाऱ्यां दोघांना अवघ्या 12 तासामध्ये जेरबंद केले आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील दोन आरोपी पसार आहेत.
बबन भाऊसाहेब घावटे (रा. राजापूर ता. श्रीगोंदा), कृष्णा पोपट गायकवाड (रा. श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली आहे. तर संकेत जाधव (रा. गोलेगाव ता.शिरुर, जि.पुणे), करण खरात (रा. हिंगणी ता. श्रीगोंदा) हे दोघे पसार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी येथे फिर्यादी राजेंद्र ताराचंद नागरे यांचे अजय ज्वेलर्स नावाने दुकान आहे. दि. 27 रोजी हे त्यांच्या दुकानात असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे बबन घावटे (रा. श्रीगोंदा) व त्याचे सोबतचे तीन अनोळखी इसम दुकानात आले. त्यांनी राजेंद्र यांचा मयत चुलतभाऊ उमेश नागरे याचा खुनाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी राजेंद्र यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिले असता, आरोपीने त्याचे कमरेला खोसलेले पिस्तुलाचा धाक दाखवून, संपुर्ण कुटुंबाला गोळ्या घालून जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने दुकानाचे भिंतीस असलेले काचेचे ट्रेमधील 5 सोन्याचे नेकलेस काढून घेतले. तसेच फिर्यादीचा मोबाईलही लांबविला. सदर घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
या घटनेचा तपास करताना पोलिसांनी दोन पथके तयार केली. घटना ठिकाणचे आजुबाजुचे रोडचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन, आरोपीबाबत माहिती संकलित केली. आरोपींचा शोध घेत असताना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हे बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने स्विप्ट कारमधून येणार असल्याची माहिती मिळाली.
दोन्ही पथकाने सदर माहिती आधारे बेलवंडी फाटा येथे सापळा रचण्यात आला. बेलवंडी गावाकडून पुणे-अहिल्यानगर हायवेकडे एक ग्रे रंगाची स्विप्ट कार येतांना दिसली, पथकाने गाडी थांबविण्याचा इशारा करुन गाडी थांबवुन गाडीतील इसमांना बाहेर येण्यास सांगितले. गाडीतील व्यक्तींना ताब्यात घेतले.
गाडीची झडती घेतली असता, 55,000/- रुपये किंमतीचे 5 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 25,000/- रुपये किंमतीची एक गावठी पिस्टल, 1400/- रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे व 7,00,000/- रुपये किंमतीची स्विप्ट कार गुन्ह्यात वापरलेली असा एकुण 7,81,400/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे बबन भाऊसाहेब घावटे हा सराईत गुन्हेगार आहे.



