अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा) : – आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची काल, शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली आहे.
आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर बँकेचे अध्यक्षपद आणि संचालकपद रिक्त झाले होते. आठ दिवसापूर्वीच बँकेच्या अध्यक्षपदावर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची निवड करण्यात आली. तर रिक्त असलेल्या संचालक पदावर युवानेते अक्षय कर्डिले यांची निवड बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या सर्वानुमते करण्यात आली.
अक्षय कर्डिले यांची बँकेच्या संचालकपदी निवड होताच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पद्मश्री पोपटराव पवार, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. अमोल खताळ, आ. विठ्ठलराव लंघे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले तसेच बँकेचे उपाध्यक्ष व सर्व संचालक तसेच महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराने देखील अक्षय कर्डिले यांचे अभिनंदन केले आहे.
कर्डिलेंकडून सत्कार न घेण्याचा निर्णय
आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी पक्षश्रेष्ठी व कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर सक्रिय कार्यक्रमात सहभागी होण्याची भूमिका घेतली. अनेक कार्यक्रम पार पडले. मात्र वर्षभर कुठलाही सत्कार घेणार नसल्याची भावना युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केल्याने बँकेच्या संचालकपदी निवड झाली असली तरी अक्षय कर्डिले यांनी सत्काराला मात्र पूर्णपणे फाटा दिला आहे.



