श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) : – जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची असलेली कमतरता तसेच शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे रिक्त पदाबाबत आपण लक्ष घालणार असून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार निमित्ताने काल त्यांनी मिल्लतनगर भागात दौरा केला. यावेळी ते बोलत होते. त्याप्रसंगी उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, समीर खान, सज्जाद हुसेन नवाब, जाबीर सय्यद व साहित्य परिषदेच्या अन्य सदस्यांनी याबाबतचे निवेदन नामदार विखे यांना देऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे. शिक्षक नसल्याने पालक उर्दू शाळेत मुले टाकायला तयार नाहीत. परिणामी जिल्ह्यातील काही शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.सुदैवाने पवित्र पोर्टलमार्फत पाच शिक्षक आपल्या जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. त्यांची नियुक्ती करताना खालील शाळांचा प्राधान्य क्रमाने विचार करण्यात यावा. त्याचे कारणही पुढे नमूद केले आहे.
जि. प. उर्दू शाळा पाचेगाव (ता. नेवासा) एक ते आठ पर्यंत वर्ग आहेत. मराठी माध्यमाचा एक शिक्षक तिथे आहे. मात्र तो ही दीर्घ रजेवर आहे. त्यामुळे आज मितीस या शाळेवर शिक्षक नाही.
जिल्हा परिषद उर्दू शाळा माळी बाभुळगाव शाळेवर शिक्षक नाही परिणामी पालक शाळेत मुले टाकायला तयार नाही. त्यामुळे येथे तातडीने शिक्षक देणे आवश्यक आहे.जिल्हा परिषद उर्दू शाळा, केडगाव शाळेचा एक ते चार चा पट 52 आहे व शाळेवर एकच शिक्षक आहे. नगर तालुक्यातील एक दर्जेदार शाळा आहे. त्यामुळे येथे तातडीने दुसरा शिक्षक देणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद उर्दू शाळा एकलहरे शाळेवर सध्या एकच शिक्षिका असून त्यादेखील मे महिन्यात निवृत्त होणार आहे. त्यामुळे येथे देखील शिक्षक देणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे उर्दू विभागाचे शिक्षण स्टार अधिकारी रमजान पठाण यांच्या निधनानंतर गेल्या दीड वर्षापासून ती जागा अद्याप रिक्त आहे. त्यामुळे उर्दू शाळांच्या तपासणीवर विपरीत परिणाम झाला आहे. उर्दू शाळेंच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे हे पद तातडीने भरण्याची मागणी देखील उर्दू साहित्य परिषदेमार्फत करण्यात आली.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरच होणार आहे. त्यामध्ये प्राधान्यक्रमाने ज्या उर्दू शाळांमध्ये शिक्षकाची आवश्यकता आहे तेथे त्यांची नियुक्ती व्हावी. त्याचप्रमाणे इतर उर्दू शाळांवर देखील पट संख्येच्या प्रमाणात शिक्षक नाही.
शासनाकडून पवित्र पोर्टल मार्फत येणारे शिक्षक खूप उशिरा येतात. तसेच जे येतात ते सर्वच हजर होत नाहीत. त्यामुळे देखील पदे रिक्त राहतात. या सर्व बाबींचा परिणाम जिल्ह्यातील उर्दू शाळांवर होत आहे व उर्दू शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असून शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी ११ महिने किंवा २९ दिवसाच्या करारावर विशेष बाब म्हणून उर्दू शाळांवर शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टल मार्फत येणारे शिक्षकांच्या नियुक्त्या ऊर्दू शाळांवर प्राधान्यक्रमाने करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली .
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले, अभिषेक खंडागळे, इंद्रनाथ थोरात, समीर पटेल, समीन बागवान, मुदस्सर शेख आदि उपस्थित होते.



