श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):– तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना हा पक्ष प्रवेश करण्यात आला डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”
दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!



