spot_img
spot_img

कोल्हार-भगवतीपुर तिसगाववाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ बिबट्याच्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू

कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार भगवतीपुर तिसगाव वाडी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धुमाळ वस्तीनजीक बाळासाहेब विठ्ठल गोयकर मजुराच्या घराजवळ बांधलेल्या कालवडीवर रात्री अंदाजे एकच्या सुमारास बिबट्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हल्ल्याच्या क्षणी मजूर प्रत्यक्षस्थळी उपस्थित होता. बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या अंगावर येण्याच्या तयारीत असल्याचे मजुराने सांगितले. प्रसंगावधान राखत जीव वाचवण्यासाठी मजुराने तत्काळ घरात आश्रय घेतला. दरम्यान बिबट्याने कालवडेला ओढत शेजारच्या शेतात नेऊन तिथेच तिचा बळी घेतला.

या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले आणि बिबट्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. सकाळी वनविभागाला कळविल्यानंतर वनरक्षकअधिकारी प्रतीक गजेवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्ल्याचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी कोल्हार बुद्रुक येथील पशुवैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारीही उपस्थित होते. पंच म्हणून महिंद्रा खडके व सुनील अंगरखे इतरांच्या उपस्थितीत पंचनामा पूर्ण करण्यात आला. हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर देण्याचे आश्वासन वनविभागाने दिले आहे.

परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शेतीकाम करताना एकट्याने न जाण्याचा, खाली वाकून काम करताना जवळ एक व्यक्ती उभी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले.

वनरक्षक अधिकाऱी प्रतीक गजेवार यांनी ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अनोळखी हालचाली दिसताच तात्काळ वनविभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!