संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- निळवंडे प्रकल्प हा तळेगाव भागासाठी वरदान ठरू शकला असता. मात्र त्यावर राजकारण करत तुमच्या साहेबांनी चाळीस वर्षे सत्ता भोगूनही निळवंडे कालव्यांची कामे केली नाहीत. ती कामे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनाच पुढाकार घ्यावा लागला. चांगले काम सुरू असताना केवळ अडथळे आणण्याचेच काम विरोधकांनी केले असा आरोप सरपंच उषा दिघे व उपसरपंच मयूर दिघे यांनी केला आहे.
उपसरपंच मयूर दिघे म्हणाले की, तुमच्या साहेबांनी चाळीस वर्षे जनतेला फक्त नळाच्या थेंबाथेंबावर अवलंबून ठेवले. मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तळेगाव भाग पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा ठाम ध्यास घेतला असून हा दुष्काळी भाग सुजलाम–सुफलाम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.तळेगाव हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार अमोल खताळ यांनी आमदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम भागवतवाडी तळ्यांमधील पाणी पाईपलाईनद्वारे थेट तळेगावकरांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. निळवंडे प्रकल्प हा तळेगाव भागासाठी वरदान ठरू शकला असता. मात्र त्यावर राजकारण करत तुमच्या साहेबांनी चाळीस वर्षे सत्ता भोगूनही निळवंडे कालव्यांची कामे केली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
गेली चाळीस वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना पाणी कुठे आले आणि कुठे मुरले, याचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. मात्र तसे न करता उठसूट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका करणे हेच सध्या तुमचे काम राहिले आहे मागील एक वर्षात निळवंडेचे पाणी या भागात किती वेळा आले अन त्याचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती फायदा झाला, हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारण्याची हिंमत विरोधकांमध्ये आहे का, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. निळवंडेच्या पाण्यामुळे पाझर तलाव भरले, शेती फुलू लागली आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले, हे कोणीही नाकारू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले
इतिहासात प्रथमच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली भोजापूरचे पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचले. यंदा जास्त पावसामुळे पुढील भागातील पाण्याचा लाभ निमोण–तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांना झाला. त्याच अनुषंगाने या पुरचारीच्या दुरुस्तीसाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होणार आहे. त्यामुळे तळेगाव–निमोण परिसर सुजलाम–सुफलाम होईल, असा विश्वास सरपंच उषा दिघे व उपसरपंच मयूर दिघे यांनी व्यक्त केला.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या १७ गावांच्या योजनेचा बट्ट्याबोळ कोणी केला, हे त्या गावांतील जनतेला माहीत आहे. योजना इतकी मोडकळीस आली आहे की तिच्या दुरुस्तीस वेळ लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुनी समिती बरखास्त करून प्रत्येक गावातील ग्रामसेवकांचा समावेश असलेली नवी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना दर महिन्याला आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, येत्या काळात ही योजना सुरळीत सुरू राहील.
– उषा दिघे( सरपंच)
तुमच्या साहेबांची मर्जी राखण्यासाठी पोपटपंची करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर टीका करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. पाणी कुठे दिसत नसेल तर वेळ व ठिकाण सांगा आमच्या वाहनात बसा, आम्ही ते पाणी दाखवतो. तरीही जर खुमखुमी असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनतेच्या दरबारात या. जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देवू.
– मयूर दिघे( उपसरपंच)



