श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरात आज दुपारी गोळीबाराची एक थरारक घटना घडली आहे. शहरातील बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून, त्यांना तीन गोळ्या लागल्याची चर्चा होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार हे कब्रस्तानातून आपले काम आटोपून परतत होते. तेथून बाहेर पडल्यानंतर जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांना तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस दाखल झालेले आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. यामध्ये कोणी गोळीबार केला शोध घेतला जात आहे.



