spot_img
spot_img

तनपुरे कुटुंबाची दूरदृष्टी आणि योगदानामुळे तालुका जलसमृद्ध – ज्येष्ठ नेते सुरेश वाबळे

राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यात मुळा व निळवंडे धरणांचे पाणी फिरले. दुष्काळी भागाला पाणी मिळाले. मुळा व प्रवरा नदीवर बंधाऱ्यांची मालिका उभी राहिली. त्यामुळे, नदीकाठच्या गावांमधील विहिरी, कुपनलिका जिवंत झाल्या. तालुक्याची १०० टक्के बागायती क्षेत्राकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. थेट मुळा धरणातून पाणी योजना कार्यान्वित झाल्या. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला. अनेक गावांची तहान भागली. तनपुरे कुटुंबाची दूरदृष्टी आणि योगदानामुळे तालुका जलसमृद्ध झाला आहे, असे ज्येष्ठ नेते सुरेश वाबळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

वाबळे म्हणाले की, वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत समस्या स्वातंत्र्यप्राप्ती पासून आजतागायत कायम आहेत. या तीनही समस्या नाहीत, असा एकही तालुका राज्यभरात शोधून सापडणार नाही. जेथे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले, तेथे या समस्या काहीअंशी सुटल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर राहुरी तालुक्याला डॉ. बाबुराव (दादासाहेब) बापूजी तनपुरे यांच्या रूपाने शतकोत्तर वेध घेणारा द्रष्टा युगपुरुष लाभला.

सहकार महर्षी दादासाहेब तनपुरे यांनी शेतीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी १९७२ साली मुळा धरणाची निर्मिती केली. धरणाच्या मूळ आराखड्यात फक्त उजवा कालवा होता. डॉ. दादासाहेबांनी राहुरी तालुक्यासाठी धरणाच्या डाव्या कालव्याची निर्मिती केली. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांचा पाणी प्रश्न मिटला.

डॉ. दादासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी दूरदृष्टीने तालुक्याला जलसमृद्ध केले. मुळा धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्याची निर्मिती झाली. या कालव्यांच्या चाऱ्या, पोटचाऱ्या निर्माण करून धरणाचे पाणी लाभक्षेत्रात फिरविले. डाव्या कालव्यातून भागडा पाईप चारीची निर्मिती करून तालुक्याच्या पश्चिमेकडील कायम दुष्काळी गावांच्या तलावांमध्ये पाणी पोहोचविले.

मुळा धरणातून वांबोरी पाईप चारी योजना मार्गी लावली. या योजनेमुळे राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या तलावांना पाणी मिळाले. तलावांच्या पाझरातून विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी वाढली.‌ दुष्काळग्रस्त हजारो हेक्टर क्षेत्राला जलसंजीवनी मिळाली. त्यांनी दूरदृष्टीने मुळा व प्रवरा या नद्यांवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांची मालिका उभारली. मुळा नदीवर डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजुळपोई येथे बंधारे बांधले. प्रवरा नदीवर कोल्हार, केसापूर व मालुंजे खुर्द येथे बंधारे बांधले.

या बंधार्‍यांमुळे मुळा व प्रवरा नदीकाठचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. प्रवरा उजव्या कालव्याचे नूतनीकरण, मुळा डावा व उजव्या कालव्याचे नूतनीकरण केले. कालव्यांची गळती बंद करून पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी प्रयत्न केले. वन खात्याच्या माध्यमातून हजारो नाला बंडिंगची कामे केली. वनतळी बांधली. जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली.

थेट मुळा धरणातून बारागाव नांदूरसह १४ गावे पाणी योजना, कुरणवाडीसह १९ गावे पाणी योजना, राहुरी नगरपरिषद पाणी योजना अशा पिण्याच्या पाण्याच्या योजना निर्माण केल्या. त्यामुळे नागरिकांना घरोघरी नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. हजारो महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला. पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांना रोज दोन-तीन तास करावी लागणारी पायपीट बंद झाली. महिलांच्या वेळेची व श्रमाची बचत झाली. तालुका टँकर मुक्त झाला.

तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांच्या कामांना मंजुरी, पाझर तलावांची दुरुस्ती व मजबुतीकरण कामे केली. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून १२०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. संगमनेर-राहुरीच्या सीमेवरील बोगद्याचे काम पाठपुरावा करून पूर्ण करून घेतल्याने निळवंडेचे पाणी राहुरी तालुक्यात पोहोचले.

अशा प्रकारे तनपुरे कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी दूरदृष्टीने शेतीच्या व पिण्याचे पाण्याच्या समस्या मार्गे लावल्या. त्यामुळे, राहुरी तालुका १०० टक्के बागायत क्षेत्राकडे वेगाने वाटचाल करीत आहे, असेही वाबळे यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!