अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-विज चोरीची कारवाई व दंड टाळून देण्याच्या नावाखाली तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागून त्यातील ५० हजार रुपये स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) अधिकाऱ्यासह वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई नेवासा फाटा परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहायक अभियंता, वर्ग-२) व शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, प्रधान तंत्रज्ञ/वायरमन, वर्ग-३) दोघांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 03/2026 नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
तक्रारदार बाबासाहेब हराळ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मंगलमुर्ती अॅक्वा या पाण्याच्या प्लॉटसाठी घरगुती व व्यावसायिक असे स्वतंत्र वीजमीटर आहेत. दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी मोरे व आचारी यांनी मीटर तपासणी करून विज चोरीचा आरोप केला व सुमारे चार लाख रुपयांचा दंड तसेच ३६ हजार रुपयांचे थकीत बिल भरण्याची धमकी दिली.
त्यानंतर दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी दोघे पुन्हा तक्रारदाराच्या घरी आले. “चार लाखांचा दंड होण्याऐवजी दोन लाख रुपये द्या, आम्ही विज चोरीची कारवाई करणार नाही,” अशी थेट लाचेची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी सहायक अभियंता मोरे याने तडजोडीअंती १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास तयारी दर्शविली.
अखेर दि.०१ जानेवारी २०२६ रोजी देवरे हॉस्पिटलजवळ, नेवासा फाटा येथे सापळा रचण्यात आला. मोरे यांच्या सांगण्यावरून वायरमन शिवकुमार आचारी याने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती छाया कडू देवरे (सापळा अधिकारी) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोकॉ. गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक व वैभव सुपेकर सहभागी होते. संपूर्ण कारवाईवर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांचे पर्यवेक्षण होते.
या प्रकरणावर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांनी मार्गदर्शन केले.
सरकारी सेवेत असताना पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एसीबीकडून देण्यात आला आहे



