spot_img
spot_img

थकीत बिलाचा उद्रेक! सहकारी संस्थेत ट्रॅक्टर मालक–अधिकाऱ्यांत हाणामारी वर्षानुवर्षांची देणी न मिळाल्याने संताप; चेअरमनशीही वाद, तालुक्यात खळबळ

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- वर्षानुवर्षे थकीत असलेल्या ट्रॅक्टर व टँकर बिलाच्या प्रश्नातून तालुक्यातील एका सहकारी संस्थेत संतापाचा उद्रेक झाला. थकीत बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर मालक व संस्थेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांत जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यानंतर संस्थेचे चेअरमन आणि संबंधित ट्रॅक्टर मालक यांच्यातही तीव्र शाब्दिक संघर्ष झाला. हा प्रकार बुधवारी दिवसभर तालुक्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

सदर सहकारी संस्थेकडे अनेक ट्रॅक्टर व टँकर वाहने भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत. मात्र, अनेक महिने नव्हे तर काही प्रकरणांत अनेक वर्षांपासून वाहनमालकांना भाडे मिळालेले नसल्याची गंभीर तक्रार आहे. या प्रलंबित देणीमुळे वाहनमालकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर, संस्थेजवळील एका गावातील ट्रॅक्टर मालक व प्रगतशील शेतकरी थकीत बिलाबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेले. मात्र, बिल देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी अधिकाऱ्याने अर्वाच्च भाषेत बोलून केबिनबाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढत गेला आणि अखेर हाणामारीत त्याचे रूपांतर झाले.

घटनेची माहिती मिळताच संस्थेचे चेअरमन तातडीने कार्यालयात दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टर मालकास दोषी ठरवत तीव्र शब्दांत सुनावले. यामुळे संतप्त ट्रॅक्टर मालक व चेअरमन यांच्यातही चांगलीच हमरी–तूमरी झाली.

ही घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच, थकीत भाड्याच्या प्रश्नावरून अनेक ट्रॅक्टर व टँकर मालकांनी संबंधित ट्रॅक्टर मालकाला पाठिंबा दिला. “प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच परिस्थिती हाताबाहेर गेली,” असा आरोप वाहनमालकांकडून केला जात आहे.

सहकारी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, थकीत देणी तात्काळ अदा न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात संस्थेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसून, पुढील कारवाईकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!