spot_img
spot_img

महापालिका युतीनंतर भाजपमध्ये अस्वस्थता नाराज निष्ठावंतांचा रोष वाढला ,विरोधकांची ताकद वाढली

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-  महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या युतीने भाजपच्या गोटातच अस्वस्थतेचे वादळ निर्माण केले आहे. जागावाटपात निष्ठावंत कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते डावलले गेल्याची भावना तीव्र होत असून, ही नाराजी आता उघडपणे प्रचारावरही परिणाम करताना दिसत आहे. युतीमुळे अन्याय झाल्याची कबुली खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली असली, तर आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नाराज मंडळी तयार नसल्याचे चित्र सध्या अहिल्यानगरच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने युतीचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी असंतोष उफाळून आला आहे. पक्षासाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः ज्या प्रभागांमध्ये भाजपची मजबूत संघटनात्मक बांधणी होती, तेथे युतीतील घटक पक्षांना संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये “आमच्या मेहनतीचे काय?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे बोलताना परिस्थितीची जाणीव असल्याचे मान्य केले. “महापालिकेत युती झाल्याने काही निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे. त्यातील काहींना महापालिकेत वेगळ्या पदांवर संधी दिली जाईल. तसेच काही नेते व पदाधिकाऱ्यांना महामंडळावर संधी दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे आश्वासन नाराज कार्यकर्त्यांच्या गळी उतरलेले दिसत नाही.

“आज जिथे संधी मिळायला हवी होती, तिथेच आम्हाला डावलले गेले. निवडणुकीनंतर दिल्या जाणाऱ्या संधींचे आश्वासन कितपत खरे ठरेल?” असा सवाल अनेक नाराज कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. निवडणूक पार पडल्यावर वरिष्ठ नेते आणि पक्ष संघटना आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, अशी ठाम भावना या मंडळींमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यातील आश्वासनांपेक्षा सध्याच्या अन्यायावर त्यांचा रोष अधिक केंद्रित झालेला आहे.

या अंतर्गत नाराजीचा थेट परिणाम प्रचार यंत्रणेवर होत असल्याचे चित्र अनेक प्रभागांमध्ये दिसून येत आहे. काही ठिकाणी भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारापासून पूर्णपणे दूर राहत आहेत, तर काही ठिकाणी ते अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मदत करत असल्याचीही चर्चा आहे. “पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे. आमचा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही आमचा मार्ग निवडला,” असे मत काही नाराज मंडळी खासगीत व्यक्त करत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ही परिस्थिती भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. संघटनेतील निष्ठावंतांचा रोष वेळेत कमी करण्यात पक्ष नेतृत्व अपयशी ठरले, तर त्याचा थेट परिणाम मताधिक्यावर आणि महापालिकेतील सत्ता समीकरणांवर होण्याची शक्यता आहे. सध्या भाजप नेतृत्वासमोर केवळ शब्दांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून नाराजांना विश्वासात घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. निवडणुकीचा निकाल हा युतीचा राजकीय फायदा होतो की अंतर्गत नाराजीचा फटका बसतो, हे ठरवणारा ठरणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!