spot_img
spot_img

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, पती गंभीर

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील नेवासा रोडवरील ओव्हरब्रिजवर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडून एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे ओव्हरब्रिजवर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

नेवाश्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत मीना राजेंद्र सोनार (वय अंदाजे ६०, रा. गोपीनाथ नगर, श्रीरामपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या पती राजेंद्र नारायण सोनार यांच्यासह नातवाच्या वाढदिवसानिमित्त चांदा येथे जात होत्या.

नेवासा रोडकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH ४१ AU ९२६७ याने त्यांच्या TVS हेवी ड्युटी दुचाकी (MH १७ AD ४५८७) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा वेग आणि तीव्रता इतकी होती की मीना सोनार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राजेंद्र सोनार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

अपघातानंतर ओव्हरब्रिजवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही काळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून संबंधित ट्रकचालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ओव्हरब्रिजवरील वाहतूक नियोजन, वेगमर्यादा आणि जड वाहनांच्या नियंत्रणाबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!